पासपोर्टमध्ये फेरफार करणाऱ्या एका २८ वर्षीय महिलेला अलीकडेच मुंबईच्या सहार पोलिसांनी अटक केली. आरोपी महिला मागच्यावर्षी दुबईहून मुंबईत परतली होती. यावर्षी १९ फेब्रुवारीला महिला पुन्हा दुबईला जाण्यासाठी निघाली. त्यावेळी इमिग्रेशन काऊंटरवरील अधिकाऱ्याला या महिलेच्या पासपोर्ट्मध्ये घोळ दिसून आला. विमानतळावरील रेकॉर्डनुसार संबंधित महिला मागच्यावर्षी १४ मार्चला मुंबईत परतली होती. पण पासपोर्ट्वर तिची अरायव्हल डेट म्हणजे भारतात परतण्याची तारीख २० मार्च दिसत होती. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.
त्यानंतर इमिग्रेशन अधिकाऱ्याने काय केले?
विमानतळावरील इमिग्रेशन अधिकाऱ्याने लगेचच हा प्रकार आपल्या वरिष्ठांच्या कानावर घातला. त्यानंतर विमानतळावरील अधिकाऱ्यांनी तिची चौकशी सुरु केली. सुरुवातीला तिने इकडचे तिकडचे सांगून मूळ उत्तरे टाळण्याचा प्रयत्न केला. पण प्रश्नांची सरबत्ती सुरु झाल्यानंतर तिचा अश्रूचा बांध फुटला व तिने रबर स्टॅम्पच्या माध्यमातून पासपोर्ट्वरील तारीख बदलल्याचे सांगितले.
तिने असं का केलं?
आरोपी महिला मागच्या तीन वर्षांपासून दुबईमध्ये नोकरी करतेय. मागच्यावर्षी १४ मार्चला ती दुबईवरुन परतली. त्यानंतर ती लगेचच गोवा ट्रीपला गेली. २० मार्चला ती घरी परतली. महिला तिच्या एका मित्रासोबत या सिक्रेट गोवा ट्रीपला गेली होती. तिला या बद्दल कोणाला काही कळू द्यायचे नव्हते.
महिलेला तिच्या कुटुंबियांना गोवा ट्रीपबद्दल काही सांगायचे नव्हते. त्यामुळे तिने रबर स्टॅम्प वापरुन पासपोर्ट्वर दुबईवरुन भारतात परतण्याची तारीख २० मार्च केली. मधल्या सहा दिवसात १४ ते २० मार्च दरम्यान ती मित्रासमवेत गोव्यामध्ये होती.
१९ तारखेला ती पुन्हा दुबईला जाण्यासाठी निघाली. तेव्हा रेकॉर्डमधील अरायव्हल डेट पासपोर्टवरील तारखेशी मिळत नव्हती. फसवणूक केल्याच्या आरोपाखाली तिला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. न्यायालयात हजर केल्यानंतर तिला २२ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 22, 2021 6:26 pm