मोबाइल किंवा संगणकीय गेम्स हे तरुणाईला नेहमीच भुरळ घालतात. पण केवळ मज्जा आणि मस्ती म्हणून या गेम्समध्ये न अडकता मुंबईतील दोन महाविद्यालयीन तरुणांनी थेट गेम तयार करणारी कंपनीच स्थापन केली. या कंपनीचे ४५ हून अधिक गेम्स आज भ्रमणध्वनीवर उपलब्ध आहेत. १८ जणांना या कंपनीने रोजगारही दिला आहे.
रुईया महाविद्यालयातून या वर्षीच बीएमएम उत्तीर्ण झालेला प्रसाद काजरेकर आणि अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षांत शिकत असलेला निखिल वालावलकर या दोघांनी गेल्या वर्षी ‘गेमईऑन’ नावाची कंपनी स्थापन केली. या कंपनीतर्फे अँड्रॉइड, आयओएस तसेच विंडोज ऑपरेटिंग सिस्टिमवर चालणारे गेम्स विकसित करण्यात आले आहेत.
‘नॅसकॉम’च्या आकडेवारीनुसार देशातील गेमिंग क्षेत्राची उलाढाल सुमारे ८९ कोटी अमेरिकी डॉलरची आहे. देशात १०० हून अधिक कंपन्या गेम्स विकसित करण्याचे काम करतात. पण यातील बहुतांश कंपन्या परदेशी कंपन्यांशी संबंधित आहेत. पूर्ण भारतीय कंपन्यांची संख्या तुलनेत किरकोळच आहे.
देशातील गेमिंग बाजारपेठेचा फायदा उठवण्याच्या प्रयत्नात काजरेकर – वालावलकर यांची कंपनी आहे. सन २००९ मध्ये प्रसाद दहावीत होता त्यावेळेस निखिलकडे काही कामानिमित्त गेला. त्यावेळेस निखिल ‘वाइज सिटी’ नावाचा गेम खेळत होता. मूळ गेम आणि निखिल खेळत असलेल्या गेममध्ये खूप तफावत असल्याचे प्रसादच्या लक्षात आले. त्याने निखिलला विचारले असता त्याने या गेमच्या कोडिंगमध्ये काही बदल करून ‘मॉडिफाइड गेम’ तयार केल्याचे सांगितले. त्यावेळेस लहानपणापासून काहीतरी वेगळे करण्याची जिद्द असलेल्या प्रसादने निखिलला ‘तू नवीन गेम तयार करू शकशील का?’ असे विचारले आणि त्यांची गेमिंग कंपनीची मुहूर्तमेढ रोवली गेली.
दहावी झाल्यानंतर प्रसादने अॅनिमेशनचा कोर्स करण्यास तर निखिलने गेम डिझायनिंगचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. २०११मध्ये त्यांनी एक कार्यशाळा भरवली. त्यावेळेस त्यांच्याकडे १२० जणांचा चमू तयार झाला. सर्व तरूण होते. यातील अनेकांना गेम्स कसे तयार करायचे हेही माहीत नव्हते. पण काम करण्याची जिद्द सर्वाजवळ होती. मात्र एका वर्षांच्या काळात या दोघांना एवढा मोठा चमू हाताळणे अवघड असल्याचे लक्षात आले आणि त्यांनी ही संख्या कमी करत १८ पर्यंत आणली. २०१३मध्ये ‘गेमईऑन प्रा. लि.’ नावाने कंपनी स्थापन करून त्यांनी कामास सुरुवात केली.
‘काईट’ हा त्यांचा पहिला अँड्रॉइडवर चालणारा गेम ‘गुगल प्ले’वर आला आणि त्याला मिळालेला प्रतिसाद पाहून ते भारावून गेले. यानंतर त्यांनी ‘काईट थ्रीडी’ हा गेम बाजारात आणला. मग एका मागोमाग एक गेम्स अँड्रॉइड बाजारात येत गेले.
सुरुवातीला पॉकेटमनीमधील पैशांमधून काम काम करणाऱ्या या  दोघांना त्यांच्या कुटंबांचीही चांगली साथ मिळाली. आता हे दोघेही कर्मचाऱ्यांचे पगार देऊन सर्व खर्च भागवून नफाही कमवत आहेत. गेम्स आपल्याला मोफत उपलब्ध होत असले तरी आपण गेम्स खेळत असताना फ्लॅश होणाऱ्या जाहिराती हे उत्पन्नाचे मोठे साधन आहे.
या कंपनीने बाजारात आणलेल्या बॉक्स क्रिकेट, क्रिकेट या गेम्समध्ये चौकाराच्या रेषेनजीक असलेल्या फलकांसाठी स्पॉन्सरशिप मिळवून त्यातूनही अर्थाजन केल्याचे प्रसाद सांगतो. याशिवाय आम्ही संकेतस्थळ विकसित करणे, अॅप्स बनवून देणे आदी कामे करूनही पैसे कमवित असल्याचेही तो सांगतो.
मुंबई शहरावर गेम तयार करण्याचे स्वप्न
परदेशातील अनेक शहरांवर आधारित गेम्स आहेत. मात्र मुंबईशी संबंधित एकही गेम सध्या उपलब्ध नाही. यामुळे मुंबईवर आधारित थ्रीडी गेम तयार करणे हे या दोघांचे स्वप्न आहे. यासाठी सध्या ते गुंतवणूकदाराच्या शोधात आहेत.