मुंबईचा राजा म्हणून लोकप्रिय असलेल्या गणेशगल्लीच्या गणरायाची सिंहासनावर विराजमान असलेली रामस्वरुपातील ही आकर्षक, लोभस मूर्ती. शनिवारी प्रसारमाध्यमांना मुंबईच्या राजाचे दर्शन घडवण्यात आले. लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाचे यंदाचे ९२ वे वर्ष आहे. यंदा मंडळाने उत्तरप्रदेशातील अयोध्या येथील राम मंदिराची प्रतिकृती साकारली आहे.

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मुंबईच्या राजाच्या दर्शनाला १० दिवस मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. मुंबईसह महाराष्ट्रभरातून भाविक मुंबईच्या राजाच्या दर्शनाला येतात. गणेश भक्तांना नेहमीच प्रत्येक तीर्थस्थळाचे दर्शन घेणे शक्य होत नाही. अशा गणेश भक्तांचा विचार करुन त्यांना ते मंदिर पाहता यावे यासाठी दरवर्षी मंडळांकडून प्रसिद्ध मंदिराची प्रतिकृती साकारली जाते. यंदा अयोध्येतील राम मंदिर साकारले आहे अशी माहिती मंडळाचे सरचिटणीस स्वप्निल परब यांनी दिली.

यंदा मुंबईच्या राजाच्या विसर्जनासाठीही खास ट्रॉलीची व्यवस्था केली आहे. समुद्रात उतरल्यानंतर एका व्यक्तीलाही विसर्जन करणे शक्य व्हावे अशी या ट्रॉलीची रचना आहे.