राज्यात पुन्हा एकदा करोनाचा प्रकोप झाला असून, रुग्णसंख्या वेगानं वाढत आहे. त्यामुळे मुंबई आणि राज्यावर लॉकडाउनचं ओढवण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे करोनाच्या संक्रमणाला पायबंद घालण्यासाठी लसीकरणाला वेग देण्यात आला आहे. सार्वजनिक सुटीच्या दिवशी लसीकरण केल जाणार असून, मुंबईतील सर्वच केंद्रावर नागरिकांना लस दिली जाणार आहे. यासंदर्भात बृहन्मुंबई महापालिकेनं मुंबईकराना आवाहन केलं आहे.

“मुंबईकरांनो, शहराच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक दिवस महत्वाचा आहे याची आम्हाला जाणीव आहे. म्हणूनच आम्ही या रविवारी (४ एप्रिल) सर्व लसीकरण केंद्रे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, फक्त तुमच्यासाठी. लस घेण्यास पात्र असलेल्या व्यक्तींनी नक्की लस घ्या! आज सर्व लसीकरण केंद्रे खुले राहतील! लसीकरण मोहीम अधिक जोमाने सुरु ठेवण्यासाठी आज शहरातील सर्व लसीकरण केंद्रे सुरू ठेवण्यात येतील. ४५+ वर्ष वय असलेल्या व्यक्तींनी आधार कार्ड/पॅन कार्ड/इतर ओळखपत्रासह लसीकरण केंद्रास भेट द्या,” असं आवाहन महापालिकेनं केलं आहे.

मुंबईत मृतांची संख्या वाढली

मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्या दर दिवशी नवनवीन उच्चांक गाठत असताना आता मृतांची संख्याही वाढू लागली आहे. शनिवारी ९०९० नवीन रुग्ण आढळले, तर २७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. शनिवारी ४३ हजार ५९७ चाचण्या करण्यात आल्या. चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचे प्रमाण २० टक्क्यांहून अधिक आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्याही वाढत असून ६२ हजारांवर पोहोचली आहे, तर करोनामुक्त रुग्णांचा दर घटला असून ८३ टक्के झाला आहे.

पश्चिम उपनगर ठरतंय हॉटस्पॉट

मुंबईतील उपचाराधीन रुग्णांची संख्या ५५ हजारांच्या पुढे गेली आहे. या रुग्णांपैकी तब्बल ४९ टक्के म्हणजेच २७ हजारांहून अधिक रुग्ण हे पश्चिम उपनगरातील आहेत, तर २१ टक्के म्हणजेच ११ हजारांहून अधिक रुग्ण अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव येथील आहेत. गेल्या वर्षी मुंबईत रुग्ण वाढत होते तेव्हाही पश्चिम उपनगरच करोनाचं हॉटस्पॉट ठरलं होतं. उपचार घेणाऱ्या रुग्णांपैकी २७,०११ रुग्ण फक्त पश्चिम उपनगरात आहेत. केवळ अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव येथे ११,६२३ रुग्ण आहेत. मुंबईत आठ विभाग असे आहेत जिथे तीन हजारांहून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. त्यात पश्चिम उपनगरातील अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, बोरिवली, कांदिवली, मालाड आणि मुलुंड व घाटकोपर यांचाही समावेश आहे.