X

मुंबईमधील पार्किंगची समस्या सुटणार, अॅपवरून पार्किंगसाठी जागा बुक करता येणार

आयआरसीटीसीच्या धर्तीवर तयार करणार अॅप

मुंबई ठाण्यासारख्या शहरांमध्ये गाडी घेऊन बाहेर पडायचं म्हणजे सर्वात मोठा प्रश्न असतो पार्किंगचा. मुंबईमध्ये राहणाऱ्यांना तर पार्किंगच्या समस्येची दाहकता अधिक जाणवते हे वाहन असणारा कोणताही मुंबईकर सांगू शकतो. मात्र आता लवकरच पार्किंग कुठे करु हा मुंबईकरांना पडणारा प्रश्न सुटणार आहे. मुंबई महानगरपालिकेने आयआरसीटीसीच्या धर्तीवर मुंबईकरांसाठी एक खास अॅप लॉन्च करणार आहे. या अॅपचे काम सुरु झाल्याचे वृत्त आहे.

मुंबईकरांच्या सोयीसाठी तयार करण्यात येणाऱ्या या अॅपचा वापर करुन मुंबईकरांना शहरामधील सात ठिकाणी पार्किंसाठीची जागा ऑनलाइन पद्धतीने बुक करता येणार आहे. सुरुवातीला ही सुविधा दक्षिण मुंबईसारख्या गजबजलेल्या परिसरातील सात जागांसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यात एरोस सिनेमा, क्रॉफेड मार्केट, फ्लोरा फाऊण्टन या तीन महत्वाच्या जागांवर सुरुवातील ही सुविधा उपलब्ध करुन दिली जाईल आणि पुढील तीन महिन्यांमध्ये यात आणखीन चार जागांचा समावेश केला जाईल असे वृत्त हिंदुस्तान टाइम्सने दिले आहे.

हे अॅप डेव्हलप करण्यासाठी महानगपालिकेने काही कंपन्यांकडे विचारणा केली आहे. शहरामधील वाहतूक व्यवस्थेला या अॅपमुळे फायदा होईल असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. महानगरपालिकेला दक्षिण मुंबईमधील सर्व पार्किंग प्लॉट ऑनलाइन पद्धतीने मार्क करावे लागतील. त्यानंतर हा उपक्रम योग्य पद्धतीने राबवल्यावरच त्याचा सामान्य मुंबईकरांना फायदा होईल असे मत मुंबई विकास समितीसाठी काम करणारे वाहतूक तज्ञ ए.व्ही शेणॉय यांनी व्यक्त केले आहे.

बंगळुरमध्येही पार्किंगच्या समस्येवर उपाय म्हणून इलेट्रीक पार्किंगचा प्रयोग यशस्वीरित्या राबवला जात आहे. यामध्ये सीसीटीव्ही आणि सेन्सर्सच्या मदतीने केवळ पार्किंगच नाही तर वाहनांच्या सुरक्षिततेचीही काळजी घेतली जात आहे.

कसे काम करणार हे अॅप

हे अॅप्लिकेशन युझर्सला उपलब्ध पार्किंग प्लॉटमध्ये गाडीसाठी जागा आहे की नाही याची माहिती देईल. चालकांना या पार्किंगमध्ये त्या अॅपच्या माध्यमातूनच जागा एक तास किंवा त्यापेक्षा अधिक काळासाठी बुक करता येईल. अॅपच्या माध्यमातूनच पार्किंगचे पैसे देण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात येईल. याची पावतीही ऑनलाइन पद्धतीने त्या अॅपवरच पाठवण्यात येईल आणि तीच मोबाईलमधील पावती दाखवून गाडी पार्क करता येईल किंवा ती बाहेर काढता येईल.