विविध तांत्रिक कामांसाठी रविवार, २५ मार्च रोजी पश्चिम रेल्वेवर जंबो मेगाब्लॉक तसेच मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक, तर हार्बर रेल्वे मार्गावर विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे

’ कधी : सकाळी ११.२० ते दुपारी ४.२०

’ कुठे : कल्याण ते ठाणे अप धिम्या मार्गावर

’ परिणाम : कल्याणहून सुटणाऱ्या सर्व धिम्या आणि अर्धजलद उपनगरी गाडय़ा कल्याण ते मुलुंड रेल्वे स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावरून, तर मुलुंड रेल्वेस्थानकापासून पुढे धिम्या मार्गावर चालविण्यात येणार आहेत. अप धिम्या मार्गावर ठाकुर्र्ली, कोपर, मुंब्रा आणि कळवा या स्थानकांवर मेगा ब्लॉक कालावधीत उपनगरी गाडय़ा थांबणार नाहीत.

हार्बर/ट्रान्स हार्बर मार्ग

’ कधी : सकाळी १० ते संध्याकाळी ६

’ कुठे : वाशी ते बेलापूर अप आणि डाऊन स्थानकांदरम्यान हार्बर मार्गावर तसेच तुर्भे ते नेरुळ दरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावर

’ परिणाम : सकाळी ९.०८ ते संध्याकाळी ५.३० या वेळेत वडाळा रोड ते बेलापूर, पनवेल आणि सकाळी ९.४४ ते संध्याकाळी ५.५० या वेळेत छत्रपती शिवाजी टर्मिनस ते बेलापूर, पनवेलसाठी सुटणाऱ्या उपनगरी गाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. सकाळी ९.३९ ते संध्याकाळी ५.३४ ठाणे ते पनवेल मार्गावरील आणि सकाळी ९.४८ ते संध्याकाळी ५.५७ पनवेल ते ठाणे ट्रान्स हार्बर मार्गावरील सर्व गाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. या ब्लॉग काळात  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशी आणि पनवेल ते बेलापूरदरम्यान विशेष गाडय़ा चालविण्यात येणार आहेत. ठाणे ते वाशी ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा नियमित वेळापत्रकानुसार चालविण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वे

’ कधी : सकाळी ११ ते दुपारी ३

’ कुठे : बोरिवली ते भाईंदर दरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावर

’ परिणाम : या कालावधीत विरार, वसई रोड ते बोरिवली-गोरेगाव (अप) उपनगरी गाडय़ा अप जलद मार्गावरून तर गोरेगाव ते वसई रोड, विरार (डाऊन) उपनगरी गाडय़ा डाऊन जलद मार्गावरून चालविण्यात येणार आहेत. गुजरातकडे जाणाऱ्या सर्व निर्धारित लांबपल्ल्याच्या गाडय़ांना भाईंदर येथे थांबा देण्यात येणार आहे.