रस्त्याने जाताना कचऱ्याचा डब्बा अथवा पाणी साठलेले दिसल्यास फक्त एक फोटो काढा आणि मुंबई महानगर पालिकेला ट्विट करा. तात्काळ प्रशासन संबधित विभागामधील कर्मचाऱ्याला पाठवून ती समस्या सोडवणार आहे. मुंबई महानगर पालिकामार्फत सोमवारी याबाबत निर्णय घेतला आहे.

सोमवारी बीएमसीच्या बैठकींमध्ये सर्व विभागाला ट्विट खाते उघडायला सांगितले आहेत. त्यामुळे पावसाळ्याच्या तोंडावर मुंबईकरांसाठी ही आनंदाची बातमी आहे. पावसाळ्यात रस्त्यावर तुंबलेलं पाणी असो किंवा कचरा सर्वांच्या तक्रारी आता थेट संबधित विभागाला अथावा बीएमसीला करता येणार आहे.

येणाऱ्या काही दिवसांमध्ये बीएमसीचे सर्व विभाग ट्विटरवर कार्यरत दिसतील. आयुक्तपदी प्रवीण परदेशी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सर्व विभागांना ट्विटरवर सक्रिय राहण्याच्या सूचना दिल्या आहे.

पालिकेच्या एका आधिकाऱ्यानं सांगितले की, सध्या बीएमसीच्या अकाउंटवर येणाऱ्या तक्रारी आम्ही संबधित विभागाकडे पाठवत आहे. त्यामुळे कमी वेळत काम होत असून मुंबईकर या सुविधेमुळे खूश आहेत. याआधी काही तक्रार असेल तर बीएमसीमध्ये फोन करावा लागत होता. त्यानंतर संबधित विभागात जाऊन लेखी तक्रार द्यावी लागत होती. त्यामुळे अनेकजणांचा वेळ वाया जात होता. मात्र, या नव्या सूविधेमुळे मुंबईकरांचा वेळ वाचणार तर आहेच शिवाय कमी वेळेत समाधान मिळणार आहे.