‘सफर’च्या आकडेवारीतून स्पष्ट; अंधेरीत दर्जा धोकादायक; मालाड, माझगाव, वांद्रे-कुर्ला परिसरात अत्यंत वाईट

मुंबई : थंडीचा जोर वाढल्याने मुंबईकरांना वायुप्रदूषणाला तोंड द्यावे लागत आहे. तापमानातील घट आणि वाढते धुरके यामुळे शहरातील हवेची गुणवत्ता गुरुवारी खालवली. ‘सिस्टम ऑफ एअर क्वालिटी अ‍ॅण्ड वेदर फोरकास्टिंग अ‍ॅण्ड रिसर्च’च्या (सफर) आकडेवारीनुसार मुंबईतील सर्वसाधारण हवेची पातळी ‘अत्यंत वाईट’ स्तरापर्यत नोंदली गेली. तसेच ‘सफर’कडून जाहीर करण्यात आलेली हवेची प्रतही निराशाजनक आहे.

मुंबईतील सांताक्रूझ येथे गुरुवारी १४.७ अंश.से. किमान तापमानाची नोंद झाली. धुके कायम राहिले. उन्हाळ्यातील उष्ण हवा हलकी असल्याने प्रदूषित घटक हवेबरोबर उंचावर जातात आणि प्रदूषणाचे प्रमाण कमी राहते. हिवाळ्यात याच्या विरुद्ध प्रक्रिया होते. रात्री आणि पहाटे पडणाऱ्या धुक्यामुळे धूर आणि धूलिकण जमिनीलगतच अडकून पडतात. ‘पीएम २.५’ (पार्टिक्युलेट मॅटर), ‘पीएम १०’ हे धुलिकण जमिनीलगतच राहिल्यामुळे प्रदूषण वाढते.

गुरुवारी अंधेरीतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक ४११ पीएम म्हणजे धोकादायक स्तरापर्यंत पोहोचला. तर नवी मुंबईत तो ३२२ पीएम या अत्यंत वाईट स्तरापर्यंत नोंदवला गेला. त्या खालोखाल मालाड, माझगाव, वांद्रे-कुर्ला या भागातील हवेची गुणवत्ता अत्यंत वाईट स्तरावर आली. वरळी, चेंबूर, कुलाबा या भागांतील हवेचा दर्जा वाईट स्तरापर्यंत असल्याची नोंद ‘सफर’कडे झाली. भांडुप, बोरिवली भागात मात्र हवेचा दर्जा मध्यम स्तरावर असल्याचे दिसले.

हिवाळ्यात प्रदूषण वाढल्याने श्वसनाचे विकार असलेल्या व्यक्तींच्या तक्रारी वाढू शकतात. त्यामुळे अशा व्यक्तींनी पहाटे किंवा रात्री घराबाहेर पडू नये. गर्दी किंवा जास्त रहदारीच्या ठिकाणी जाणे टाळावे. प्रवासात नाका-तोंडाला रुमाल बांधावा किंवा मास्क लावावा. हिवाळ्यापूर्वीच विषाणूप्रतिबंधक लस टोचून घ्यावी. मधुमेह, हृदयरोग, रक्तदाब असलेल्या व्यक्तींनीही शक्यतो बाहेर जाऊ नये.

– डॉ. एन. टी. आवाड, श्वसनविकार विभागप्रमुख, शीव रुग्णालय