मुंबईत घर असणं याच्यासारखी चांगली गोष्ट नाही. मात्र मुंबईत घर घेण्याचं स्वप्न तुम्ही पाहात असाल तर मुंबईतली घर खरेदी आणखी महागणार आहे. कारण स्टॅम्प ड्युटीतमध्ये वाढ करण्यासंबंधीचं विधेयक अधिवेशनात मंजूर झालं आहे. मुंबई महानगरपालिका अधिनियम विधेयक हे गोंधळ आणि गदारोळात चर्चा न होताच मंजूर झालं.
या विधेयकानुसार मुंबईतली स्टॅम्प ड्युटी १ टक्क्याने वाढणार आहे. मेट्रो, मोनो, जलद बस सेवांच्या विकासासाठी अतिरिक्त स्टॅम्प ड्युटी आकारली जाणार आहे असे या विधेयकात स्पष्ट करण्यात आले आहे. आत्तापर्यंत मुंबईतल्या घरासाठी सहा टक्के स्टॅम्प ड्युटी आकारली जात होती, जी आता सात टक्के झाली आहे. मालमत्तेची विक्री, दान आणि गहाण ठेवण्यासाठी देण्यात येणाऱ्या स्टॅम्प ड्युटीत वाढ होणार आहे. यामुळे मुंबईकरांचा घर खरेदी करतानाचा खर्च वाढणार आहे.
इमारतीतील खरेदी-विक्री भाडे तत्त्वावरचा करार, बक्षीस पात्र करारनामा, गहाण ठेवलेली कागदपत्रे याकरिता स्टॅम्प ड्युटी भरावी लागते. आता एक टक्का वाढ झाल्याने स्टॅम्प ड्युटी सात टक्के होणार आहे. नोटबंदीच्या निर्णयानंतर मुंबईतील रिअल इस्टेटमध्ये मंदीचे वातावरण असातना मुंबईत स्टॅम्प ड्युटीत होणाऱ्या वाढीमुळे या व्यवसायावर आणखी परिणाम होण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिका कायदा २०१८ मध्ये स्थावर मालमत्तेसंदर्भात स्टॅम्प ड्युटीचा दर ठरवण्यासाठी दुसऱ्यांदा बदल करण्यात आले आहेत. मुंबईत वाढणाऱ्या लोकसंख्येसोबतच समस्येचा जटिल बनला आहे. स्टॅम्प ड्युटीचा वाढीव भार हा विकास प्रकल्पांसाठी खर्च केला जाणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 27, 2018 9:02 pm