प्रशासनाने दिलेले लक्ष्य पूर्ण करणे अधिकाऱ्यांसाठी अवघड; महापालिकडून लवकरच जनजागृती मोहीम

प्रसाद रावकर, लोकसत्ता

मुंबई : मुंबईत दररोज १४ हजार चाचण्यांचे महापालिकेने ठरवले असले तरी करोना काळजी केंद्र वा करोना आरोग्य केंद्रातील सुविधांबाबत असलेले गैरसमज, नोकरी वा काम जाण्याची भीती यांमुळे अनेक मुंबईकर करोना चाचणी करण्यास उत्सुक नसल्याने हे लक्ष्य गाठायचे कसे, असा पालिका अधिकाऱ्यांसमोर प्रश्न आहे. प्रशासनाने करोना चाचण्यांचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करणे विभाग पातळीवर अधिकाऱ्यांसाठी अवघड बनू लागले आहे.

गेल्या काही दिवसांपासून झोपडपट्टय़ांमधील करोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्याच वेळी इमारतींमध्ये मोठय़ा प्रमाणावर रुग्ण सापडत आहेत. आजघडीला ७० टक्के रुग्ण इमारतींमधील रहिवासी आहे. इमारतींमध्ये वाढणारा करोना संसर्ग रोखणे गरजेचे बनले आहे. पण रहिवाशांकडून सहकार्य मिळत नाही, असे पालिका अधिकाऱ्यांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीमध्ये करोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यात हळूहळू यश येत आहे. मात्र आता धारावीतील रहिवासी करोना चाचणी करून घेण्यासाठी तयार होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. गणेशोत्सवानिमित्त होणारी गर्दी लक्षात घेऊन धारावीतील काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांमध्ये ताप तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र त्यालाही नागरिकांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळाला, अशी खंत ‘जी-उत्तर’ विभागातील अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर व्यक्त केली. असाच अनुभव पालिकेच्या अन्य विभाग कार्यालयांमधील अधिकाऱ्यांना येत आहे. पालिकेच्या ‘के-पश्चिम’ म्हणजे अंधेरी (पश्चिम) परिसरातील नागरिकांना करोना चाचणी करण्यासाठी विविध माध्यमातून आवाहन करण्यात येत आहे. यासाठी सामाजिक संस्था, सार्वजनिक मंडळे, समाजसेवक, नगरसेवक आदींची मदत घेण्यात येत आहे, असे ‘के-पश्चिम’ विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

जनजागृतीवर भर

चाचणी केल्यावर आपण बाधित असल्याचे निष्पन्न होईल. त्यानंतर आपल्याला रुग्णालयात वा करोना आरोग्य केंद्रात घेऊन जातील, अशी भीती रहिवाशांच्या मनात घर करून बसली आहे. त्यामुळे अनेक जण चाचणी करण्यास तयार होत नाहीत. त्यामुळे नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण करण्याच्या दृष्टीने जनजागृती मोहीम हाती घेण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

आपल्यामुळे इतरांचे आरोग्य धोक्यात येऊ नये याची प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज आहे. पालिकेने उपचारासाठी पुरेशी व्यवस्था केली आहे. कोणाच्याही उपचारांमध्ये हयगय होणार नाही. चाचणीअंती बाधा झाल्याचे निदर्शनास आले आणि घर मोठे असल्यास गृह विलगीकरणात राहण्यास परवानगी दिली जाते. त्यामुळे नागरिकांनी भीती न बाळगता चाचणी करून घ्यावी. 

– सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, महापालिका