03 March 2021

News Flash

दंड भरू पण, कचरा करूच

जुलै महिन्यात पहिल्या आठवडय़ात क्लीन अप मार्शलकडून जनजागृती करण्यात आली.

‘स्वच्छ भारत’ची ऐशीतैशीच
‘शहाण्याला शब्दाचा मार’ ही उक्ती मुंबईकरांनी खोटी ठरवली आहेच, पण दंड आकारूनही मुंबईकर कचरा करण्याची सवय सोडायला तयार नाहीत. स्वच्छ भारत अभियानाच्या जनजागृतीसाठी विविध स्तरावर प्रयत्न करूनही शहरातील अस्वच्छता कमी होत नसल्याने क्लीन अप मार्शल मोहीमेतून पालिकेने जुलैपासून दंडवसूली सुरू केली. या मोहिमेअंतर्गत सप्टेंबरमध्ये थुंकणे, लघवी करणे, कचरा टाकणे या प्रकारांसाठी ३९ हजार जणांना दंड करण्यात आला. महत्त्वाचे म्हणजे ऑगस्टमध्ये जोरदार कारवाई करूनही अस्वच्छता करणाऱ्यांची संख्या फारशी कमी झालेली नाही.

mv02शहर स्वच्छ करण्यासाठी बी वॉर्ड वगळता इतर सर्व वॉर्डमध्ये प्रत्येकी ३० क्लीन अप मार्शलची नेमणूक करण्यात आली आहे. शहर अस्वच्छ करणाऱ्यांकडून १०० रुपयांपासून १००० रुपयांपर्यंत दंड आकारण्याचा अधिकार मार्शलना आहे. जुलै महिन्यात पहिल्या आठवडय़ात क्लीन अप मार्शलकडून जनजागृती करण्यात आली.  त्यानंतर दंड आकारण्यास सुरुवात झाली. ऑगस्टमध्ये ४७ हजार जणांवर कारवाई करण्यात आली. सप्टेंबरमध्ये ही संख्या कमी झाली असली तरी फारसा फरक पडलेला नाही. चर्चगेट, दादर व बोरीवली या सर्वाधिक गर्दीच्या ठिकाणांवरच सर्वात जास्त दंड वसूल करण्यात आला आहे. ग्रॅण्ट रोड परिसरात उघडय़ावर शौचाला बसल्याप्रकरणी दंड वसूल करण्यात आला असला तरी कचरा करणे, थुंकणे, लघवी करणे हे प्रकार या परिसरात आढळत नाहीत.  अंधेरी, विलेपार्ले पूर्व येथील परिसरात कचऱ्याचे वर्गीकरण न केल्याने १४२ जणांवर १ लाख ४२ हजार रुपये दंड आकारण्यात आला.  बी वॉर्डमध्ये अद्याप क्लीन अप मार्शल नेमण्यात आलेले नाहीत. पोलिसांकडून ओळख पडताळणीची समस्या आली होती. ती समस्या सुटली असली तरी नवीन क्लीनअप मार्शल नेमण्याची प्रक्रिया अद्यापही सुरू आहे.

सर्वाधिक कारवाई

सप्टेंबर महिन्यात दंड करण्यात आलेल्या ३९,६८२ मुंबईकरांपैकी ३५,२५६ म्हणजे तब्बल ८९ टक्के लोकांना कचरा टाकणे, थुंकणे व लघवी  करणे या कारणासाठी दंड करण्यात आला आहे. या दंडापोटी पालिकेकडे ७० लाख ५१ हजार रुपये गोळा झाले आहेत. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातही याच कारणांसाठी सर्वाधिक दंड गोळा करण्यात आले होते.

उघडय़ावर शौचाला बसल्यामुळे दंड

ग्रॅण्ट रोड परिसरात संपूर्ण शहराच्या तुलनेत सर्वात कमी जणांवर दंड करण्यात आला आहे. या विभागात सप्टेंबरमध्ये दंड करण्यात आलेल्यां ५२५ पैकी ४५७ जणांना उघडय़ावर शौचाला बसल्यासाठी दंड ठोठावला गेला आहे. महत्त्वाचे म्हणजे कचरा, लघवी किंवा थुंकण्यासाठी एकाही व्यक्तीला डी विभागात दंड आकारला गेला नाही. एन वॉर्डमध्ये ३७८ व्यक्तींनी, एम पूर्व म्हणजे १३७ आणि जी उत्तरमध्ये ११५ जणांनी उघडय़ावर शौचाला बसल्याप्रकरणी दंड भरला.

दंड आकारणी

रस्त्यावर शौचास बसणे – १०० रुपये

कचरा टाकणे, थुंकणे, लघवी करणे, कपडे, भांडी धुणे – २०० रुपये

पाळीव प्राण्यांकडून रस्त्यांवर घाण होणे,

कचराकुंडी न ठेवलेला दुकानदार – ५०० रुपये

गाडी धुणे, मांसमच्छीचा कचरा वेगळा न करणे – १००० रुपये

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2016 1:46 am

Web Title: mumbaikars not serious to keep city clean
Next Stories
1 ताडी भेसळयुक्तच!
2 स्वच्छतेच्या जनआंदोलनामुळे हागणदारीमुक्तीत महाराष्ट्र अव्वल
3 मराठा आरक्षणाबाबत न्यायालयाने सरकारला फटकारले नाही
Just Now!
X