वसई : मुंबई शहरात करोना संसर्गाचा प्रादुर्भाव झपाटय़ाने वाढू लागला आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने बहुतेक मुंबईकरांचा ओढा वसई-विरारकडे असल्याचे निदर्शनास आले आहे. बहुतेक मुंबईच्या नागरिकांनी गुंतवणूक म्हणून वसई-विरारमध्ये घरे खरेदी केली आहेत. त्यांनी आता वसई-विरारमध्ये राहण्यासाठी येण्याची तयारी दर्शवली आहे.

करोना विषाणूच्या संसर्गामुळे सर्वत्र टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. हा संसर्ग सर्वत्र वेगाने फैलाव होत असल्याने अनेकांनी मोठी धास्ती धरली आहे. त्यातच आता वसई-विरारमध्ये मुंबईतील नागरिक राहाण्यासाठी येणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ज्या गृहसंकुलामध्ये घर खरेदी केले आहे, ठिकाणच्या राहिवाशांशी संपर्क साधला जात असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.

विरार पश्चिमेतील बोळींज येथे उभारण्यात आलेल्या म्हाडा वसाहतीमध्येही मुंबई येथे राहाणाऱ्या नागरिकांची घरे विकत घेतली आहेत. मुंबईत वाढता करोनाचा धोका लक्षात घेता वसई-विरारमध्ये असलेल्या घराकडे परतण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. असे जरी असले तरी वसई-विरार शहरातही करोनाबाधितांचा आकडा वाढलेला असून अनेक रुग्ण नोकरीनिमित्त मुंबईत ये-जा करणारेच आहेत. त्यामुळे जर मुंबईतील नागरिक वसई-विरारमध्ये येत असतील तर करोना संसर्गाचा धोका अधिक वाढण्याची भीती येथील रहिवाशांनी व्यक्त केली आहे.  मुंबई राहणारे नागरिक नेमक्या कोणत्या विभागामध्ये वास्तव्यास आहेत याची कल्पना नाही. येणारे नागरिक हे जर स्वत:हून अलगीकरणात राहिले नाही तर करोनाची भीती अधिक असल्याचे नागरिकांनी सांगितले.

मुंबईतील नागरिक विरारमध्ये राहाण्यासाठी येऊ  इच्छितात. परंतु वसई-विरार शहर लाल क्षेत्रात आहे. त्यामुळे येणाऱ्या नागरिकांच्या तपासणीचे काय आणि ते स्वत:हून काळजी घेतील का, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. तसेच जर करोना संसर्गाचा धोका वाढला तर तेवढी यंत्रणा आपल्याकडे उपलब्ध आहे का, हाही विचार होणे आवश्यक आहे

– सखाराम महाडिक, नगरसेवक

ज्यांची घरे म्हाडा कॉलनीमध्ये आहे, ते या ठिकाणी येण्यासाठी दूरध्वनी करून संपर्क करत आहेत. करोना संसर्ग पसरू नये आणि सर्वाच्या सुरक्षेसाठी आम्ही येथील रहिवासी एकमेकांना सहकार्य करण्याची विनंती करीत आहोत.

– नीलेश कोळेकर, नागरिक, म्हाडा वसाहत