News Flash

मनसेच्या गुंडगिरीविरोधात मुंबईकरांनी उभे राहिले पाहिजे: संजय निरूपम

मनसेचे नेते फेरीवाल्यांकडून हप्ता घेतात, असा आरोप केला.

संग्रहित छायाचित्र

चिथावणीखोर भाषण देऊन फेरीवाल्यांना भडकावल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर काही वेळातच संजय निरूपम यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप व मनसेवर आरोपांच्या फैऱ्या झाडल्या. फेरीवाल्यांकडून हप्ता घेण्यासाठी त्यांना नियमित केले जात नाही. अवैध फेरीचा धंदा सुरूच राहावा असे अनेकांना वाटते, असे म्हणत मनसेचेही काही नेते फेरीवाल्यांकडून हप्ता घेतात, असा थेट आरोप केला. गृहखाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारीत आहे. पण पोलीस खात्याकडून मनसेच्या या दादागिरीकडे दुर्लक्ष केले जाते. फेरीवाल्यांच्या तक्रारींची दखल घेतली जात नाही. मनसेच्या या गुंडगिरीविरोधात आता मुंबईकरांनीच उभे राहिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

मनसे कार्यकर्ता आणि विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांच्या डोक्यावर फेरीवाल्यांनी रॉडने वार केला होता. या हल्ल्यात माळवदे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. संजय निरूपम यांनी फेरीवाल्यांना चिथावणी दिली होती, असा आरोप मनसेने केला होता. त्यांच्या तक्रारीची दखल घेत निरूपम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या पार्श्वभूमीवर निरूपम यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.

फेरीवाल्यांच्या संरक्षणासाठी कायदा आहे. शहरात हॉकिंग्ज झोन तयार व्हायला हवेत. पण आतापर्यंत कोणीच ‘नो हॉकिंग झोन’ किंवा ‘हॉकिंग झोन’साठी प्रयत्न केले नाहीत. मुख्यमंत्री आणि आयुक्तांना कोण रोखत आहे. कोणाला अवैध फेरीवाले बंदच करायचे नाहीत. त्यांना हा धंदा सुरूच राहावा असे वाटते. या फेरीवाल्यांकडून अनेक पक्षातील नेते हप्ता घेतात. मनेसेचेही काही नेते हप्ता घेतात. त्यांची नावे मी लवकरच सांगणार आहे, असेही ते म्हणाले.

मनेसेचे नेहमीच असं सुरू असतं. कधी दुकानावरच्या पाट्यांवर कोणती भाषा असावी, टॅक्सीवाल्यांना, फेरीवाल्यांना मारहाण, बाहेरून आलेल्या लोकांवर हल्ले करणे हे प्रकार सुरू असतातच. मनसेच्या या गुंडगिरीविरोधात मुंबईकरांनी उभे राहिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

एलफिन्सटन दुर्घटनेचे राजकारण करत मनसे फेरीवाल्यांना लक्ष्य करत असल्याचा आरोप त्यांनी केला. रेल्वेच्या एक्जिट आणि एंट्री पॉईंटवर फेरीवाले नसावेत ही आपली भूमिका असल्याचे ते म्हणाले. फेरीवाल्यांनी स्वरक्षणासाठी प्रतिकार केल्यास काहीही चूक नसल्याचे सांगत त्यांनी समर्थनही केले.

यावेळी त्यांनी नितेश राणे यांनाही टोला लगावला. नितेश राणे सध्या कोणत्या पक्षात आहेत, हे प्रथम शोधावे लागेल, असे ते म्हणाले. मालाडच्या हल्ल्यात एकही काँग्रेसचा कार्यकर्ता नव्हता असे त्यांनी स्पष्ट केले.

नितेश यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून काँग्रेसच्या भूमिकेवर टीका केली करत मराठी माणसाला झालेली मारहाण खपवून घेणार नाही. मग तो कुठल्याही पक्षाचा असेल, असा इशारा दिला होता. काँग्रेसला आपली ओळख फक्त उत्तर भारतीयांचा पक्ष अशीच ठेवायची आहे का? काँग्रेसला मराठी माणसांच्या मतांचीही गरज आहे. पण तुर्तास तसे दिसत नाही, असे नितेश यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2017 5:20 pm

Web Title: mumbaikars should stand against mns bullying says sanjay nirupam hawkers
Next Stories
1 फेरीवाल्यांना चिथावल्याप्रकरणी संजय निरुपम यांच्यावर गुन्हा दाखल
2 अनधिकृत फेरीवाल्यांकडून मराठी माणसाला झालेली मारहाण खपवून घेणार नाही- नितेश राणे
3 राज ठाकरेंनी घेतली मनसे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदेंची भेट
Just Now!
X