मुंबई मेट्रोसाठी तत्कालीन फडणवीस सरकारने आरे येथे कारशेडसाठी जागा निश्चित केली होती. मात्र, ठाकरे सरकार सत्तेत आल्यानंतर कारशेडची ही जागा रद्द करुन इतरत्र हालवण्याचे प्रयत्न झाले. यावरुन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. “पुढील काही वर्षे अंडरग्राऊंड मेट्रोचे फोटो काढण्यासाठी मुंबईकरांना दिल्ली किंवा कोलकात्याला जावं लागेल” अशा शब्दांत त्यांनी सरकारवर टीका केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांचं वर्षभराचा लेखाजोखा नावाच्या पुस्तकाचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी प्रकाशन झाले. यावेळी ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, “मी नुकतचं दिल्लीहून एअरपोर्टला जाण्यासाठी मेट्रोमध्ये बसलो तेव्हा मला एक तास लागला. त्याचवेळी माझ्या लक्षात आलं की, कुलाब्यावरुन मुंबई विमानतळावर जाण्यासाठी आपल्याला २०२१ मध्ये केवळ २५ मिनिटं लागतील. आता २०२१ साल आलं ८० टक्के काम झालं होतं, उरलेलं काम थांबल आहे. मग माझ्या लक्षात आलं की पुढील दोन तीन वर्षे काम होऊ शकत नाही. कारण जर मुंबई विमानतळावर कुलाब्यातून किंवा मुंबईतील कुठल्याही भागातून लोकल किंवा मेट्रो-३ मधून जायचं असेल तर आरेमध्येच कारशेड करावं लागेल. पण काही लोकांनी हा विषय प्रतिष्ठेचा केला त्यामुळे पुढील चार वर्षे मुंबईकरांना मेट्रो-३ मध्ये बसता येणार नाही. मुंबईकरांना मेट्रो-३ किंवा अंडरग्राउंड मेट्रोचे जर फोटो काढायचे असतील तर दिल्ली किंवा कोलकात्यालाच जाऊन फोटो काढावे लागतील आपल्याला मुंबईत तशी संधी मिळेल असं आम्हाला वाटत नाही.”

ग्रामपंचायतच्या निवडणुकीत भाजपाचं मोठा पक्ष ठरला हे जनतेनं दाखवून दिलं. त्यामुळे यापुढेही आपल्याला मोठं काम करावं लागेल. जेवढा वेळ विरोधी पक्षात राहू सत्तेचा विचार डोक्यात आणायचा नाही. पूर्ण न्याय देत शेवटच्या माणसाचा आवाज बनून काम करु, असंही यावेळी फडणवीस उपस्थित भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbaikars will have to travel to delhi or kolkata to take photos of the underground metro says devendra fadanvis aau
First published on: 28-01-2021 at 19:33 IST