17 December 2017

News Flash

मुंबईकर सर्वाधिक तणावग्रस्त; दिल्लीवासी दुसऱ्या क्रमांकावर

सर्वेक्षणातून चिंताजनक आकडेवारी समोर

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: October 12, 2017 7:43 AM

प्रतिकात्मक छायाचित्र

भारतीय महानगरांमधील बहुतांश कर्मचारी तणावाखाली आयुष्य जगत असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. सर्वाधिक तणावाखाली काम करणाऱ्या नोकरदारांच्या यादीत मुंबई पहिल्या स्थानावर आहे. मुंबईतील सुमारे ३१ % कर्मचारी तणावग्रस्त असल्याची चिंताजनक आकडेवारी लीब्रेट या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. मुंबईसोबतच देशातील इतर महानगरांमधील नोकरदार वर्गदेखील तणावग्रस्त जीवन जगत असल्याचे धक्कादायक वास्तव सर्वेक्षणातील आकडेवारीवरुन अधोरेखित झाले आहे.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील ३१ % नोकरदार वर्ग तणावाखाली काम करतो. यानंतर देशाची राजधानी असलेल्या दिल्लीचा क्रमांक लागतो. दिल्लीतील २७ % कर्मचारी तणावग्रस्त आहेत. यानंतर बंगळुरु (१४ %), हैदराबाद (११ %), चेन्नई (१० %) आणि कोलकाता (७ %) यांचा क्रमांक लागतो. अतिशय व्यस्त दिनक्रम, उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी असलेला दबाव, ऑफिसमधील राजकारण, ऑफिसमध्ये जास्त वेळ थांबून करावे लागणारे काम, वरिष्ठांचे वर्तन, त्यांच्याकडून न मिळणारे प्रोत्साहन, काम आणि घर यांच्यातील असंतुलन यामुळे देशाच्या महानगरांमधील अनेक कर्मचारी तणावाखाली जगत आहेत.

देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यात महत्त्वाची कामगिरी पार पडणारा महानगरांमधील कर्मचारी वर्ग मानसिक तणावाचा सामना करतो आहे. ‘तणावाखाली असलेले बहुतांश लोक त्यांचे मित्र आणि कुटुंबाशी याबद्दल संवाद साधत नाहीत,’ असे लीब्रेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक सौरभ अरोरा यांनी म्हटले. ‘तणावाचा सामना करणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्या भावना मित्र किंवा कुटुंबीयांकडे व्यक्त करण्याची गरज आहे. त्यांनी मनातील खदखद बोलून दाखवायला हवी,’ असेही ते म्हणाले. ‘नेमक्या कोणत्या कारणामुळे आपण तणावाखाली आहोत, हे संबंधित व्यक्तीने शोधायला हवे. एकदा कारण शोधल्यावर तणाव कमी करण्यासाठी पावले उचलणे सोपे होते. दीर्घ कालावधीपासून तणाव कायम राहिल्यास गंभीर शारीरिक समस्या उद्भवू शकतात,’ असा धोक्याचा इशाराही अरोरा यांनी दिला.

First Published on October 12, 2017 7:43 am

Web Title: mumbaikars worst hit by stress delhi stands second says survey