मुंबईत शुक्रवारी करोनाचे १ हजार २२८ नवे रुग्ण आढळले असून ६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील एकूण बाधितांची संख्या ९८ हजारांच्या पुढे गेली आहे, तर मृतांचा आकडा ५५८२ वर गेला आहे. मात्र मुंबईतील ७० टक्के  रुग्ण करोनामुक्त झाले असून हा दर देशाच्या व राज्याच्या सरासरी दरापेक्षा जास्त आहे. दिल्लीतील करोनामुक्तीचा दर मुंबईपेक्षा अधिक आहे.

मुंबईतील एकूण बाधितांची संख्या ९८,९७९ वर गेली आहे. मात्र त्याचबरोबर ७० टक्के  म्हणजेच ६९,३४० रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. महाराष्ट्राचा करोनामुक्तीचा दर ५५ टक्के असून देशाचा दर ५२ टक्के आहे. या दोन्हीपेक्षा मुंबईचा दर खूप जास्त आहे. या गोष्टीची दखल केंद्र सरकारच्या पत्र सूचना कार्यालयाने घेतली असून तसे प्रसिद्धीपत्रकही काढले आहे. करोनामुक्त रुग्णांचा दर वाढला की उपचाराधीन (सक्रिय) रुग्णांची संख्या कमी होत जाते आणि ही अतिशय आशादायक गोष्ट असल्याचे यात म्हटले आहे.

जूनच्या मध्यापर्यंत मुंबईतील ५० टक्के  रुग्ण करोनामुक्त झाले होते. त्यानंतर पालिकेने ‘मिशन झिरो’ ही मोहीम हाती घेतली व रुग्णसंख्या कमी करण्यावर भर दिला. त्यानंतर १ जुलैला ५७ टक्के  रुग्ण करोनामुक्त झाले. १५ जुलैपर्यंत ७० टक्के  रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. दरम्यान, दिल्लीतील करोनामुक्त रुग्णांची टक्केवारी मुंबईपेक्षा अधिक चांगली आहे. दिल्लीत १ लाख १८ हजार एकूण बाधित रुग्ण असून येथील ८२ टक्के  रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

पनवेल विलगीकरण केंद्रात रुग्णावर बलात्कार

पनवेल : येथील ‘इंडिया बुल’ करोना विलगीकरण केंद्रात दाखल केलेल्या महिलेवर गुरुवारी रात्री एका रुग्णाने बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी हा करोनाबाधित असल्याने अद्याप त्याला अटक केलेली नाही, अशी माहिती पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी दिली.

ठाणे जिल्ह्यात नवे १,७०७ रुग्ण

जिल्ह्यात शुक्रवारी १ हजार ७०७ नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात करोनाची लागण झालेल्या एकुण रुग्णांची संख्या ६४ हजार १०५ वर पोहोचली आहे. तर, दिवभरात ४९ रुग्णांचा करोनामुळे मृत्यु झाल्याने जिल्ह्यतील मृतांचा आकडा १ हजार ८२७ इतका झाला आहे. शुक्रवारी नोंद झालेल्या रुग्णांत कल्याण-डोंबिवली शहरातील ४०७, ठाणे  शहरातील ३१२, नवी मुंबईतील २४०, उल्हासनगर शहरातील २३७, मीरा-भाईंदरमधील १६५, ठाणे ग्रामीणमधील ११७, अंबरनाथमधील ९६, बदलापूरमधील ६४ आणि भिवंडीमधील ३९ रुग्णांचा समावेश आहे.