मुंबईतील नोकरदार वर्गाला घरगुती जेवणाचा पुरवठा करणारे मुंबईच्या डबेवाल्यांनी देखील करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने महत्वाचं पाऊल उचललं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी आपली सेवा २० मार्च ते ३१ मार्च या ११ दिवसांच्या कालावधीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईच्या डबेवाल्यांनी १३० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच सलग १० दिवस आपली सेवा बंद ठेवली आहे. ज्याप्रमाणे राज्यातील विविध देवस्थानच्या यात्रा, मंदिरं इतिहासात पहिल्यांदाच बंद करण्यात आली आहेत. तसेच जी भुमिका इतर सर्व सेवा देणाऱ्या संघटनांनी घेतली आहे तीच भुमिका मुंबईच्या डबेवाल्यांनी देखील घेतली आहे, असे डबेवाला संघटनेच्या प्रतिनिधींनी सांगितले आहे.

दरम्यान, सरकारने करोना विषाणूचा फैलाव रोखण्याच्या दृष्टीने सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा जास्त लोक एकत्र येणार नाहीत असे निर्देश दिले आहेत. याबाबत कडक अंमलबावणीसाठी आता प्रशासनही कामाला लागले आहे. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या, व्यापारी संघटना, ज्वेलर्स संघटना इतर सेवा देणाऱ्या संघटनांनीही शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत काही काळ बंद पाळण्याचे निश्चित केले आहे.

राज्यात करोनाग्रस्तांची संख्या ४९ वर पोहचली आहे. सुरुवातीला ही संख्या कमी होती. मात्र आता त्यात वाढ झाली आहे. गेल्या चार दिवसांमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे. दरम्यान, आम्ही सर्वतोपरी काळजी घेत आहोत अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. प्रत्येकाने काळजी घ्यावी, घरी सुरक्षित रहावं. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. ३१ तारखेपर्यंतचे दहा दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे. फेज २ मधून फेज ३ मध्ये जाऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत असंही टोपे यांनी म्हटलं आहे.