मुंबईसह महाराष्ट्रात मागच्या काही दिवसांपासून सातत्याने करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. पण मुंबईकरांसाठी आज त्यातल्या त्यात थोडी दिलासा देणारी बातमी आहे. मुंबईत मंगळवारी ६४३ नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. मागच्या काही दिवसांपासूनचा मुंबईतील रुग्णवाढीचा वेग लक्षात घेता, सलग दुसऱ्यादिवशी मुंबईत करोना रुग्णांच्या संख्येमध्ये घट झाली आहे.

सोमवारी ७६१ करोना रुग्णांची नोंद झाली होती. त्याआधी रविवारी ९२१ करोना बाधितांची नोंद झाली होती. मुंबईत आतापर्यंत ३ लाख २० हजार ५३२ जणांना करोनाची बाधा झाली आहे. सोमवारी मुंबईत करोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नव्हता. पण आज मंगळवारी करोनामुळे आठ जणांचा मृत्यू झाला. करोनामुळे मुंबईत आतापर्यंत ११ हजार ४५४ जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत नव्या करोना बाधितांची संख्या कमी झाली असली, तरी महाराष्ट्रात मात्र करोना रुग्णांचा आकडा वाढतोय. मंगळवारी महाराष्ट्रात ६,२१८ करोना बाधितांची नोंद झाली. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी १ हजार नव्या करोना रुग्णांची वाढ झाली. आरोग्य खात्याच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात आतापर्यंत 15,860,912 करोना चाचण्या झाल्या आहेत.