दिवसभरात १८९ करोनाबाधितांची नोंद; आतापर्यंत उपचारानंतर ७१ जण घरी

करोनामुळे मुंबईमधील २५ वर्षांच्या युवकासह १२ जणांचा शनिवारी मृत्यू झाला असून मृतांची संख्या ७६ वर पोहोचली आहे. तर करोनाची लागण झालेल्या १८९ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईतील करोनाबाधितांची संख्या ११८२ वर पोहोचली आहे. करोनाबाधितांचा आकडा हजाराच्या वर गेल्यामुळे मुंबईची चिंता वाढली आहे. शनिवारी दोघांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे त्यांना घरी पाठविण्यात आले.

मुंबईतील वरळी, भायखळा, गिरगाव, ग्रॅन्ट रोड, ताडदेव या परिसरातील करोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. आता करोनाग्रस्त परिसरांमध्ये वांद्रे-पूर्व आणि धारावीचाही समावेश झाला आहे. सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीतील रहिवाशांचे करोनापासून संरक्षण करण्यासाठी स्वतंत्र कृती आराखडा आखण्यात आला आहे. तर वरळीमध्येही अतिधोकादायक परिसर निश्चित करण्यात आले आहेत.

मुंबईमधील रुग्णालयांमध्ये शनिवारी दिवसभरात २९३ करोना संशयित भरती झाले असून रुग्णालयात दाखल संशयितांची संख्या ४३२८ वर पोहोचली आहे. तर शनिवारी १८९ जणांना करोनाची बाधा झाल्याचे चाचणी अहवालावरून स्पष्ट झाले. मुंबईतील एकूण करोनाबाधितांची संख्या ११८२ वर पोहोचली आहे.

प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे दोघांना घरी पाठविण्यात आले असून घरी पाठविण्यात आलेल्यांची संख्या ७१ वर पोहोचली आहे.

वरळी येथे वास्तव्यास असलेल्या एका डॉक्टरला करोनाची बाधा झाली असून शुश्रूषा रुग्णालयात रुग्ण तपासणीच्या निमित्ताने हे डॉक्टर तेथे आले होते. त्यांच्या संपर्कात आलेले एक रुग्ण, दोन परिचारिका आणि डायलिसिससाठी आलेल्या एका व्यक्तीला करोनाची बाधा झाली. तर शुश्रूषा रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकाचा त्यात समावेश असून त्यांच्या घरातील पाच जणांना करोनाची बाधा झाल्याचे शनिवारी उघडकीस आहे.  के. ई. एम. रुग्णालयातील परिचारिकेलाही करोनाची लागण झाली असून त्यांना पुढील उपचारांसाठी सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे १५ चतुर्थश्रेणी कामगार आणि ७ परिचारिका यांना ५ दिवसांसाठी घरी विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. यापूर्वीही २ चतुर्थश्रेणी कामगारांना कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला असल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरलेले आहे.

१० जणांना दीर्घकालीन आजार

२५ वर्षीय युवकासह १२ जणांचा मृत्यू करोनामुळे झाल्याचे शनिवारी उघड झाले. या युवकाला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ११ पैकी १० जणांना दीर्घकालीन आजार होता. तसेच ११ पैकी १० जणांचा मृत्यू ५ ते १० एप्रिलदरम्यान झाला असून त्यांचा आहवाल आज प्राप्त झाला.

निर्जतुकीकरणासाठी अद्ययावत यंत्रणा

* रुग्णालयांचा परिसर, सार्वजनिक स्वच्छतागृहे आणि इतर ठिकाणांचे निर्जतुकीकरण करण्यासाठी औषध फवारणी करण्यात येत आहे.

* अग्निशामक दलातील १४ वाहने आणि ११ एरिअल मिस्ट ब्लोईंग मशीन वापरण्यात येत आहेत.

* त्यात रविवारपासून चार अद्ययावत वाहनांचा समावेश केला आहे. ही वाहने परदेशात निर्जतुकीकरणासाठी वापरण्यात येत आहेत.