संदीप आचार्य 
मुंबई: मुंबईतील धारावीमध्ये करोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत हे खरे आहे कारण आम्ही संपूर्ण ताकद तेथे रुग्ण शोधण्यासाठी लावली आहे. यात लपवण्यासारखं काहीच नाही, उलट आता ३५० खासगी डॉक्टर पुढे आले असून व्यापक तपासणीची मोहीम राबवत असल्यानेच तुम्हाला एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण दिसत आहेत असे आत्मविश्वास पूर्ण उद्गार आहेत, अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांचे.

“मुंबईत काही दिवसांपूर्वी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे पथक आले होते. त्यांनी धारावीची पाहाणी केल्यानंतर धारावीतील स्थिती कशी नियंत्रित होणार? असा प्रश्न त्यांना पडला होता. खरं तर संपूर्ण मुंबईतच काय होणार हा प्रश्न अनेकांना आजही पडताना दिसतो. मुंबईत आज जवळपास साडेआठ हजार करोनाबाधित सापडले आहेत तर धारावीत जवळपास ६००हून अधिक करोनाबाधित सापडले आहेत. संपूर्ण राज्याचा आकडा सुमारे साडेतेरा हजार एवढा असून त्यात एकट्या मुंबईत साडेआठ हजार रुग्ण सापडतात, याचाच अर्थ मुंबई महापालिका सर्वशक्तीनीशी करोनाशी लढाई करते आहे, हे लक्षात घेतले पाहिजे” असे सुरेश काकाणी यांनी सांगितले.

“मुंबई महापालिकेने जवळपास ९० हजार संशयितांच्या चाचण्या केल्या असून संपूर्ण देशात एवढ्या चाचण्या कोणत्या राज्याने केलेल्या नाहीत. यामागे निश्चित अशी भूमिका आहे. आम्ही सर्व बाबींचा अभ्यास केला. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन सतत घेत आहोत. मुंबईची लोकसंख्या, घनता, झोपडपट्टी विभाग यासह अनेक गोष्टी विचारात घेऊन योजनाबद्ध पद्धतीने काम करत आहोत. धारावीसारखे लोकसंख्येची घनता जास्त असलेले विभाग लक्षात घेऊन मुंबईत ७५ हजार जणांसाठी संस्थात्मक क्वारंटाइनची व्यवस्था करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत ५० हजार लोकांसाठी संस्थात्मक क्वारंटाइनची व्यवस्था पूर्ण झाली आहे” असंही सुरेश काकाणी म्हणाले.

“धारावीसारख्या विभागांचा विचार करून जास्तीतजास्त स्क्रिनिंग करण्यावर आम्ही भर दिला आहे. यासाठी खासगी डॉक्टर व रुग्णालयांची मदत घेण्यात आली असून या सर्व डॉक्टरांना पालिकेच्या वतीने पीपीइ किट व एन ९५ मास्क दिला जात आहे. आज मोठ्या संख्येने धारावीतील खासगी डॉक्टर आपले दवाखाने बिनधास्तपणे चालवत असल्याचे दिसून येईल. या डॉक्टरांनी स्क्रिनिंग केलेल्या रुग्णामधील संशयित रुग्णांच्या चाचण्या करण्यात येत असल्यानेच धारावीची करोना रुग्णांची आकडेवारी जास्त दिसते. या करोनाबाधित रुग्णांची वर्गवारी करून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी अथवा क्वारंटाइनसाठी पाठवले जाते. यासाठी धारावीतच सुमारे तीन हजार लोकांच्या क्वारंटाईनची व्यवस्था केली असून यापुढे हा धारावी पॅटर्न आम्ही अन्य विभागातही राबविणार आहोत” असंही अतिरिक्त आयुक्त काकाणी यांनी सांगितले.

या पॅटर्नमध्ये जास्तीतजास्त लोकांची तपासणी त्यातून आवश्यक असलेल्या लोकांची चाचणी करणे व त्यानंतर उपचारांची व्यवस्था तसेच क्वारंटाइन केले जाते. पालिकेच्या यंत्रणेबरोबरच स्थानिक खासगी डॉक्टरांना विश्वासात घेतल्यामुळे जलदगतीने जास्तीतजास्त लोकांची तपासणी करणे शक्य होत आहे. महत्वाचे म्हणजे स्थानिक डॉक्टरांमुळे लोकही पुढे येऊन सहकार्य करत असल्याचे सुरेश काकाणी यांनी सांगितले. या विभागाचे सहायक पालिका आयुक्त किरण दिघावकर म्हणाले. साधारणपणे ५२० एकरात धारावी पसरली असून येथील घरे दाटीवाटीने वसलेली आहेत. साधारण आठ लाख लोक येथे राहात असून ४०० ते ५०० सार्वजनिक शौचालये आहेत. त्यामुळे धारावीत करोनाबाधितांना शोधणे व उपचार करणे हे एक आव्हानच होते. मात्र आतापर्यंत आम्ही ७९ हजार लोकांची छाननी केली. यातून जे रुग्ण संशयित वाटले त्यांची चाचणी केली. धारावीतच ३००० लोकांच्या क्वारंटाइनची व्यवस्था करण्यात आली असून आतापर्यंत २३८० जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.

३५० डॉक्टर व त्यांच्या दवाखान्यांच्या सहाय्याने हे काम करण्यात आले आहे. या डॉक्टरांना पीपीइ किट, एन ९५ मास्क, पल्स ऑक्सिमीटर तसेच आवश्यकती सामग्री पालिकेने पुरवली आहे.याशिवाय येथील पाच रुग्णालयांनी सहकार्य केले असून सुमारे १५० बेड यातून उपलब्ध झाले आहेत. दवाखाने व रुग्णालयांच्या निर्जंतुकीकरणाचे कामही पालिकेने करून दिले असून सुरुवातीला येथील २४ डॉक्टर पुढे आले होते आता ती संख्या ३५० एवढी झाली आहे. “धारावीत प्रामुख्याने हातावर पोट असलेले लोक राहात असल्याने १९ हजार लोकांची आम्ही सकाळ संध्याकाळ जेवणाची व्यवस्था केली. या सर्वांना रोज ३८ हजार अन्नाची पाकिटे दिली जातात तसेच २० हजार कुटुंबांना स्वयंसेवी संस्थांच्या मदतीमधून धान्य दिले आहे” असे किरण दिघावकर यांनी सांगितले. “अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने धारावीसारख्या विभागात आमचे काम सुरु आहे. मुख्यतः खाजगी डॉक्टरांचे सहकार्य मिळविण्यात आम्ही यशस्वी ठरलो असून हिच कार्यपद्धती अन्य विभागातही राबविण्यात येईल” असेही सुरेश काकाणी यांनी सांगितले.