News Flash

मुंबईच्या गोविंदांना ठाण्यात मज्जाव!

मुंबईत हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच आयोजकांनी नियमानुसार दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्याची तयारी दर्शविली आहे.

| September 4, 2015 12:27 am

आयोजकांनी काढता पाय घ्यायला सुरुवात केल्यानंतर आता मुंबईमधील गोविंदा पथकांना ठाण्यात बंदी करण्यात आली आहे. ठाण्यातील गोविंदा पथकांनीच ही बंदी घातल्यामुळे मुंबईकर गोविंदा चक्रावले आहेत. मात्र असे असले तरीही कोणत्याही परिस्थितीत मुंबईत दणक्यात गोपाळकाला साजरा करायचा यावर मुंबईतील गोविंदा पथके ठाम आहेत.  तसेच चित्ररथांच्या माध्यमातून सरकारचा निषेध करण्याच्या विचारात गोविंदा पथके आहेत.ठाण्यातील मोठय़ा आयोजकांनी उत्सवातून काढता पाय घेतल्यानंतर आता ठाण्यातील गोविंदा पथकांमध्येही दुफळी निर्माण झाली आहे. दहीहंडीबाबत न्यायालयाने दिलेल्या आदेशाची पोलिसांकडून काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार असल्याने ठाणेकर गोविंदा पथके बिथरली आहेत. या गोविंदा पथकांनी मुंबईमधील दहीहंडी समन्वय समितीला पत्र पाठवून मुंबईतील गोविंदा पथकांनी ठाण्यात येऊ नये, अशी विनंती केली आहे. ठाणेकरांच्या या पत्रामुळे समन्वय समितीही चक्रावली आहे.संकटसमयी एकत्र येऊन निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्याऐवजी ठाणेकरांनी मुंबईतील गोविंदा पथकांना ठाणे बंदी केल्यामुळे नवा प्रश्न निर्माण झाला आहे. ठाण्यात गेलो आणि तिथल्या गोविंदा पथकांशी वाद झाल्यास उत्सवाला वेगळे वळण लागेल या भीतीने मुंबईकर पथकांनी आपल्या वेळापत्रकातून ‘ठाणे’वारी वगळण्यास सुरुवात केली आहे. मुंबईकर गोविंदा पथकांमध्ये दोन प्रकार आहेत. एक म्हणजे उंच दहीहंडय़ा फोडणारी आणि दुसरे आपल्या विभागातच चार-पाच थर रचून दहीहंडी फोडून उत्सव साजरा करणारी छोटी गोविंदा पथके. कडक नियमांचा छोटय़ा गोविंदा पथकांना फारसा फरक पडलेला नाही. केवळ १२ वर्षांखालील मुलांना दहीहंडीमध्ये सहभागी करता येणार नाही. त्यामुळे लहान मुलांना थरापासून दूर ठेवून उत्सव साजरा करण्याची तयारी छोटी पथके करीत आहेत. मात्र सात थरांहून अधिक थर रचणारी गोविंदा पथके अडचणीत आली आहे. त्यांनीही आपल्या विभागात फिरून उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.मुंबईत हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच आयोजकांनी नियमानुसार दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे आपल्या विभागातील मानाच्या आणि आयोजकांनी बांधलेल्या दहीहंडय़ा फोडून उत्सव साजरा करण्याच्या विचारात गोविंदा पथके आहेत.राज्य सरकार आणि विशेष करून भाजप नेत्यांनी सुरुवातीपासून दहीहंडी उत्सवाबाबत स्पष्ट भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळे चित्ररथाच्या माध्यमातून सरकारचा निषेध करण्याची तयारी गोविंदा पथकांनी सुरू केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2015 12:27 am

Web Title: mumbais govinda team not allowed in thane
Next Stories
1 ‘दी बॉम्बे आर्ट सोसायटी’च्या निवडणुकीसाठी कलावंतांची रणधुमाळी
2 पदरमोड करून गोविंदा जल्लोषात साजरा करण्याचा निर्धार
3 शीना बोरा हत्याकांड : पीटर मुखर्जी पुन्हा चौकशीसाठी खार पोलीस ठाण्यात
Just Now!
X