दूध उत्पादक शेतकऱ्याच्या खात्यावर प्रतिलिटर पाच रुपये अनुदान थेट खात्यावर जमा करावे या मागणीसाठी १६ जुलैपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी आंदोलन छेडणार आहेत. मुंबईला होणारा सुमारे ७० लाख लिटर दूध पुरवठा पूर्णतः बंद केला जाणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. शासनाने निर्णय घेतल्याशिवाय दुधाची नाकेबंदी करणारे आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी माहिती खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. हे आंदोलन करताना प्रसंगी कायदा हातात घेतला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला असल्याचा उल्लेख करून शेट्टी म्हणाले, दुधाच्या उत्पादनाचा प्रति लिटर खर्च ३५ रुपये असताना शेतकऱ्यांना अवघे १८ रुपये मिळत आहेत. यामुळे दूध उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. त्याला शासनाने मदत केली पाहिजे. कर्नाटक शासनाप्रमाणे प्रतिलिटर चार रुपये अनुदान थेट शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केले पाहिजेत. शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका स्वाभिमानी संघटनेची आहे. शेतकऱ्यांसाठी संघर्ष करताना सत्तेत आहोत की विरोधात याचा विचार न करता आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे राहिलो आहोत.

सध्या दूध विक्रेते तोट्यामध्ये व्यवसाय करीत असून गुजरात सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने दूध उत्पादक व्यावसायीकांना ४५० कोटी रुपये द्यावेत. यावेळी दूध उत्पादक शेतकऱ्याना शासनाने दिलासा दिला पाहिजे, अन्यथा मुंबईला होणारा नाशिक, पुणे, अहमबाबाद या तिन्ही मार्गाचा दूध पुरवठा पूर्णपणे रोखून धरून दूधकोंडी केली जाईल. यासाठी लाठ्या खाण्याची आणि संघर्ष करण्याची तयारी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यभर मेळावे घेणार
दूध उत्पादक शेतकऱ्यावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी राज्यभर मेळावे घेण्यात येणार आहेत. सर्व जिल्ह्यात मेळावे घेतले जाणार असून कोल्हापुरात ६ जुलै रोजी पहिला मेळावा होणार आहे, असे राजू शेट्टी यांनी यावेळी सांगितले.