मुंबई पोलिसांच्या सेवेत असणाऱ्या एका पोलीस उपनिरिक्षकाने पुण्यातील संगम पुलाजवळील धावत्या रेल्वे खाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. पुणे लोहमार्ग पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, साजन सानप असे या आत्महत्या केलेल्या पोलीस उपनिरिक्षकाचे नाव आहे. मुंबईतील जोगेश्वरी येथील अंबोली पोलीस ठाण्यात तो कार्यरत होता. एक महिन्यापूर्वीच खात्यातील अंतर्गत परिक्षेद्वारे त्याची हवालदार पदावरुन उपनिरिक्षक पदावर बढती झाली होती.
दरम्यान, सानप दोन दिवसांपूर्वी गावी नाशिकला गेला होता. येथे उपनगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात एका महिलेने बलात्कार आणि अॅट्रॉसिटीची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत पोलीसांनी त्याला अटक करुन कोठडीत ठेवले होते. दरम्यान, कोठडीतून तो पळून गेला आणि थेट पुण्यात दाखल झाला. दरम्यान, आज त्याने पुण्यातील संगम पुलाजवळील रेल्वे ट्रॅकवर धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली.
नाशिकमध्ये सानपविरोधात दाखल केलेल्या तक्रारीत महिलेने म्हटले आहे की, ‘सानप आणि त्याचे मित्र आपल्याला सातत्याने त्रास देत होते. सानपने आपल्यावर अनेकदा बलात्कारही केला आहे. त्याने माझ्या नवऱ्याला ठार मारण्याची धमकीही दिली होती.’ त्यामुळे सानपवर भादंवि कलम ३७६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच अनुसुचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा अर्थात अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गतही त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 27, 2018 1:31 pm