बारमालक मात्र नव्या नियमांना आव्हान देण्याच्या तयारीत

नव्या कायद्यातील अटींची येत्या ६० दिवसांत पूर्तता केल्याशिवाय बार सुरू करता येणार नाहीत, ही राज्य सरकारची भूमिका सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा फेटाळून लावली असून पोलिसांनी परवाने दिलेल्या एरो पंजाब, साईप्रसाद आणि इंडियाना या तीन बारमालकांना केव्हाही बार सुरू करण्याची परवानगी दिली आहे. तसेच सरकारने घातलेल्या अटींची ६० दिवसांत पूर्तता करण्याची मुभाही न्यायालयाने दिली आहे. त्यामुळे मुंबईत पुन्हा एकदा डान्स बार सुरू होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र सरकारच्या अटींमुळे बार चालविणे अशक्य असल्याने या अटींना पुन्हा एकदा न्यायालयात आव्हान देण्याची तयारी बारमालकांनी सुरू केली आहे.

डान्स बारला लगाम घालण्यासाठी सरकारने काही दिवसांपूर्वीच ‘महाराष्ट्र हॉटेल, उपाहारगृहे, आणि मद्यपान कक्ष(बार रूम) यामधील अश्लील नृत्यावर प्रतिबंध घालण्याबाबत व त्यामध्ये काम करणाऱ्या महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याबाबतचा कायदा केला असून त्याबाबतची नियमावलीही जाहीर करण्यात आली आहे. मात्र हा कायदा येण्यापूर्वी अर्ज केलेल्या आणि काही अटींची पूर्तता केलेल्या अंधेरीमधील रत्ना पार्क, दुर्गा प्रसाद, गुड्डी, साईप्रसाद, उमा पॅलेस मुलुंड, नटराज टिळकनगर आणि इंडियाना बार ताडदेव या आठ बारच्या मालकांना विशेष बाब म्हणून डान्स बारची परवानगी देण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार गुन्हेगारी पाश्र्वभूमीची एकही व्यक्ती बारमध्ये ठेवणार नाही अशा हमीपत्रानंतर तसेच २ लाखांची फी भरणाऱ्या इंडियाना, साईप्रसाद, ऐरो पंजाब या तीन बारना मुंबई पोलिसांनी परवाने दिले आहेत. त्यानुसार बार सुरू करण्याची तयारी या बारमालकांनी केली असतानाच नव्या कायद्यानुसार लागू करण्यात आलेल्या अटींची येत्या ६० दिवसांत पूर्तता केल्याशिवाय आणि त्याची पोलिसांना खात्री पटल्याशिवाय बार सुरू करता येणार नाहीत, अशी भूमिका सरकारने घेतली होती. त्यास या बारमालकांनी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

  • नव्या कायद्यानुसार लागू करण्यात आलेलया नियमांचे पालन करायचे झाल्यास एकही व्यक्ती बारमध्ये येणार नाही. त्यामुळे बार चालणे अशक्य असून रात्री ११.३० पर्यंत बार सुरू ठेवण्याची अटही अन्यायकारक असल्याने सरकारच्या नव्या नियमांनाही पुढील सुनावणीच्या वेळी न्यायालयात आव्हान देण्यात येणार असल्याची माहिती एका बारमालकाने दिली.
  • या अटी शिथिल झाल्याशिवाय बार सुरू होणार नाहीत, असेही त्याने सांगितले.