News Flash

मुंबईचा टक्का वाढला, कल्याणकरांकडून निराशा

कल्याण मतदारसंघात कमी मतदान झाले. नेहमीप्रमाणेच उल्हासनगरमध्ये अल्प मतदान झाले.

(संग्रहित छायाचित्र)

मतदानाचा टक्का वाढावा म्हणून निवडणूक आयोग, राजकीय पक्ष, विविध सामाजिक संघटनांनी वेगवेगळ्या पातळ्यांवर जनजागृती करूनही जवळपास निम्म्या मुंबईकरांनी मतदानाचा हक्क बजाविला नाही. तरीही २०१४च्या तुलनेत यंदा मतदानाचा टक्का काहीसा वाढला आहे. कल्याणकरांनी मात्र मोठी निराशा केली. राज्यात सर्वात कमी मतदानाची नोंद कल्याणमध्ये झाली.  मुंबईत मतदानाचा टक्का वाढत नाही, असा अनुभव होता. २००९ मध्ये मुंबईत ४५ टक्क्य़ांच्या आसपास मतदान झाले होते. २०१४ मध्ये मोदी लाटेत मुंबईत सरासरी ५३ टक्के मतदान झाले होते. यंदा प्राथमिक अंदाजानुसार ५४ ते ५५ टक्के मतदान झाले आहे. तरीही मुंबईत अपेक्षित मतदान झालेले नाही.  मुंबईत मध्यमवर्गीय, झोपडपट्टय़ा आणि अल्पसंख्याकबहुल भागांमध्ये चांगले मतदान झाले. मुंबई, ठाण्यात सकाळपासून मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. कल्याण मतदारसंघात कमी मतदान झाले. नेहमीप्रमाणेच उल्हासनगरमध्ये अल्प मतदान झाले.

ईशान्य  मुंबई

गुजरातीबहुल पट्टय़ात मतदानासाठी रांगा

सकाळच्या सत्रात मतदारांमधील उत्साह, मतदान केंद्राबाहेर लागलेल्या रांगा,  काही ठिकाणी मतदान यंत्रात बिघाडाच्या तक्रारींचा अपवाद वगळता  ईशान्य मुंबई लोकसभा मतदार सोमवारी शांततेत मतदान पार पडले. मुलंड, विक्रोळी, भांडूप पश्चिम,घाटकोपर पश्चिम, घाटकोपर पूर्व या मतदार संघातील मतदारांनी भरभरून मतदान केले. मात्र मानखुर्द शिवाजीनगर मधील मतदारांनी मतदान केंद्राकडे पाठ फिरविल्याचे चित्र दिसत होते. सन २०१४च्या निवडणुकीतील ५२.७६ टक्केच्या तुलनेत यावेळी या मतदार संघातील मतदानाची टक्केवारी वाढून ५६ टक्केच्या पुढे गेली आहे.

मुलुंड, भाडूंप, घाटकोपर अशा २० ते २२ ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड झाल्याने मतदानाला विलंब  झाला. मुलुंड, भांडूप पश्चिम, घाटकोपर पूर्व  विधानसभा मतदार संघात अनेक केंद्रावर मतदारांच्या मोठय़ा रांगा लागल्या होत्या. मुलुंड- घाटकोपरमध्ये गुजराती मतदार मोठय़ा संख्येने रस्त्यावर उतरल्याचे चित्र दिसत होते. त्याचवेळी  भांडूपच्या सह्य़ाद्री नगर, कोकण नगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या बुथवर मतदारांची मोठी गर्दी दिसत होती. मुलुंड-भांडूप पट्टय़ात मतदान केंद्रांच्या बाहेर राजकीय पक्षांचे बॅनर्स सर्रासपणे झळकत होते.

उत्तर – पश्चिम  मुंबई

मराठी मतदार ‘झाडून’ उतरला..

उत्तर पश्चिम मुंबईत मोठय़ा संख्येने असलेला मराठी मतदार यंदाही मतदानासाठी झाडून उतरल्याचे चित्र सकाळपासूनच पाहायला मिळत होते. गोरेगावातील शास्त्रीनगर, मोतीलाल नगर, जयप्रकाश नगर, दिंडोशी, जोगेश्वरी पूर्वेतील मेघवाडी, अंधेरी पश्चिमेतील डी. एन. नगर, सरदार पटेल नगर आदी परिसरातील मतदान केंद्रांमध्ये सकाळी नऊ वाजल्यानंतर भल्यामोठय़ा रांगा दिसत होत्या. दुपारी १२ ते १ वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी या परिसरात ३० टक्क्य़ांच्या आसपास होती. हा परिसर मराठीबहुल असून तो दरवेळी मोठय़ा संख्येने मतदानासाठी उतरतो. यंदाही त्यांनी आपली ही परंपरा कायम राखल्याचे दिसत होते. शिवसेनेचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने या मराठी मतदारांवर लक्ष केंद्रित करीत होते. अंधेरी पूर्व, जोगेश्वरी पूर्वेच्या काही भागात उत्तर भारतीयांचे प्राबल्य आहे. या ठिकाणीही मतदानकेंद्रात दुपारनंतर मोठय़ा रांगा दिसत होत्या. तशीच परिस्थिती जोगेश्वरी पश्चिम, अंधेरी पश्चिम, मिल्लत नगर, बेहरामबाग आदी मुस्लीमबहुल परिसरातील मतदान केंद्रांमध्येही दिसत होती.

दक्षिण  मुंबई

उच्चभ्रू वस्तीत चांगले मतदान

मराठी टक्का ओसरलेल्या परिसरातील अमराठी मतदार मोठय़ा संख्येने मतदानासाठी घराबाहेर पडल्यामुळे दक्षिण मुंबई लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले मुख्य प्रतिस्पर्धी शिवसेना-भाजप युती आणि काँग्रेसच्या उमेदवारांना विजयाचा अंदाज बांधणे अवघड बनले होते. मलबार हिलसारख्या उच्चभ्रू वस्तीमधून मोठय़ा संख्येने मतदान झाल्यामुळे या संभ्रमात अधिकच भर पडल्याचे चित्र दिसत होते.

भाजप आमदार मंगलप्रभात लोढा यांचा दबदबा असलेल्या मलबार हिल परिसरातून मोठय़ा संख्येने मतदान झाले. याचबरोबर उद्योगपती मुकेश अंबानी यांनी मिलिंद देवरा यांना पाठिंबा दर्शविल्याने मराठी मतदारांमध्ये त्याची प्रतिक्रिया उमटली आणि शिवसेनेचे हक्काचे मतदार मतदानासाठी उतरले होते. मुस्लीमबहुल पट्टय़ात सायंकाळी रांगा लागल्या होत्या.

उत्तर – मध्य  मुंबई

मतदारांच्या रांगा

मराठी-गुजराती भाषिकांबरोबरच मुस्लीम-ख्रिश्चन मतदारांनी उत्साहाने केलेल्या मतदानामुळे उत्तर-मध्य मुंबईत ५४ टक्क्यांहून अधिक मतदान झाले. या मतदारसंघात २०१४ मध्ये ४८.७ टक्के मतदान झाले होते. राममंदिर व हिंदुत्वाच्या मुद्दय़ामुळे काही प्रमाणात मतदारांचे काही प्रमाणात ध्रुवीकरण झाल्याने आणि मतदारांची संख्या घटल्याने टक्केवारी वाढण्यास हातभार लागला. आता हे मतदान कोणाला फायदेशीर ठरणार, याविषयी उत्सुकता आहे. भाजप खासदार पूनम महाजन आणि काँग्रेस उमेदवार प्रिया दत्त यांच्यात अटीतटीची लढत होणार असून मताधिक्य तुलनेने कमी राहील, अशी शक्यता आहे.

भाजपकडून हिंदूत्व व राममंदिराच्या मुद्दय़ावर भर दिल्याने काही प्रमाणात ध्रुवीकरण झाले आणि मुस्लीमबहुल परिसरात २०१४ च्या तुलनेत मतदान वाढल्याचे चित्र दिसून आले. कुर्ला, वांद्रे परिसरात सकाळपासूनच मतदानासाठी रांगा होत्या, तर कडक उन्हातही दुपारी रांगा वाढल्याचे दिसून आले. मतदारांच्या उत्साहाचा व वाढलेल्या मतदानाचा लाभ आपल्यालाच मिळेल, असे भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांना वाटत आहे.

उत्तर –  मुंबई

मतदारांचे ध्रुवीकरण

भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात बोरिवली, कांदिवली या परिसरात भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आला. तुलनेत काँग्रेसकडे कार्यकर्त्यांची वानवा दिसून आली. काही ठिकाणी मनसेचे कार्यकर्ते काँग्रेसच्या मदतीला धावून आले. काँग्रेसने आपली ताकद मालवणी, मागाठाणे, गणपत पाटील नगर अशा मराठी-मुस्लीमबहुल व निम्न मध्यमवर्गीय भागात लावली होती. काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्या मागे मनसे उभी राहिल्याने इथे गुजराती विरूद्ध मराठी असे ध्रुवीकरण होण्याची शक्यता आहे. या ध्रुवीकरणामुळे इथला गुजराती भाषक, उच्चवर्णीय, मध्यमवर्ग मतदार मोठय़ा संख्येने मतदानासाठी उतरला. मागील काही निवडणुकांची आकडेवारी पाहता दक्षिण मुंबई पाठोपाठ या भागात मतदारांमध्ये निरुत्साह दिसून येतो. परंतु, १९९९पासून हे चित्र सातत्याने बदलते आहे.

दक्षिण – मध्य  मुंबई

झोपडपट्टय़ांमध्ये उत्साह

दक्षिण-मध्य मुंबई या लोकसभा मतदारसंघातील झोपडपट्टय़ा, चाळींमध्ये नेहमीप्रमाणे मतदानाचा उत्साह दिसला. मात्र गेल्या वर्षांच्या तुलनेत मतदानाचा टक्का किंचितच वाढला. मतदानासाठी मतदारांना आवाहन करत फिरणारे मनसेचे कार्यकर्ते, हा चर्चेचा विषय ठरला होता.

या मतदारसंघात झोपडपट्टय़ांमध्ये नेहमीच मतदानाच्या दिवशी उत्साहाचे वातावरण असते. यावेळीही त्याला अपवाद नव्हता. काँग्रेस व शिवसेनेचे कार्यकर्ते मतदारांना मतदानासाठी बाहेर पडण्याचे आवाहन करीत होते. लोक सकाळपासून रांगा लावून मतदान करीत होते. देवनार, चेंबूर, सिद्धार्थ नगर वसाहत, शीव-कोळीवाडा धारावीमध्ये हा उत्साह दिसला. माहीम, धारावी, अणुशक्तीनगर या भागातील मुस्लीम समाज मोठय़ा संख्येने मतदानासाठी बाहेर पडला होता. दादर भागात मनसेचे कार्यकर्ते सक्रिय होते, काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन मतदानाची स्थिती ते जाणून घेत होते. झोपडपट्टय़ा किंवा चाळकऱ्यांमध्ये मतदानाचा उत्साह होता, पण तुलनेत मध्यमवर्गीय पट्टय़ात तेवढा उत्साह जाणवला नाही.

ठाणे

मध्यमवर्गीयांमध्ये उत्साह

ठाणे, नवी मुंबई आणि मीरा भाइंदर हा या तीनही शहरांमध्ये सोमवारी सकाळपासूनच मतदानाचा जोर दिसून येत होता. या मतदारसंघातील शहरी, उच्चभ्रू वस्त्यांमधील मतदान केंद्रांवर वाढलेले मतदान लक्ष वेधून घेणारे ठरले. ठाणे शहरातील नौपाडा, पाचपाखाडी, टेंभी नाका या शिवसेना-भाजपचा बालेकिल्ला असलेल्या वस्त्यांमध्ये मतदानाचा जोर दिसून येत होता. घोडबंदर भागात नव्याने उभ्या राहिलेल्या हिरानंदानी इस्टेट, लोढा, रुस्तमजी या मोठय़ा संकुलांमध्येही सकाळपासून मतदानाचा जोर कायम होता. यापुर्वीच्या निवडणुकांमध्ये मतदानाच्या दिवशी राजकीय कार्यकर्त्यांमार्फत आपले हक्काचे मतदार बाहेर काढण्यासाठी चढाओढ पाहायला मिळते. यंदा मात्र शहरी, मध्यमवर्गीय वस्त्यांमधील मतदार स्वतहून घराबाहेर पडत असल्याने कार्यकर्त्यांना फारशी कसरत करावी लागत नव्हती. या मतदारसंघातील इतर शहरांच्या तुलनेत सकाळच्या सत्रात मीरा-भाईदर भागातील गुजराती, मारवाडी, जैनबहुल वस्त्यांमधून मतदार मोठय़ा प्रमाणावर मतदानासाठी उतरल्याचे पाहायला मिळाले. नवी मुंबईतही गुजराती वस्त्यांमधील मतदानाची वाढलेली टक्केवारी चर्चेचा विषय बनली होती.

कल्याणमध्ये अल्प प्रतिसाद

कल्याण लोकसभा मतदारसंघात कमी मतदान झाले. डोंबिवली या शिवसेना-भाजपच्या  बालेकिल्ल्यात तुलनेने चांगले मतदान झाले. यामुळेच शिवसेनेच्या गोटात उत्साहाचे वातावरण होते. . कल्याण डोंबिवली हद्दीतून वगळावे यासाठी आक्रमक भूमिका घेतलेल्या डोंबिवलीलगत असलेल्या २७ गावांमध्येही दुपारी उशिरापर्यंत मतदान केंद्रावर मोठी गर्दी दिसत होती. व्यापारी शहर अशी ओळख असलेल्या उल्हासनगरात यंदाही जोर दिसून आला नाही. कल्याण मतदारसंघात राज्यात सर्वात कमी मतदानाची नोंद झाली.

भिवंडी  ‘आपल ठरलय’ संदेशाचीच चर्चा

कॉँग्रेस आणि भाजप या दोन पक्षात काटय़ाची टक्कर असलेल्या भिवंडी लोकसभा मतदारसंघात जिल्ह्यातील इतर भागांच्या तुलनेत मतदानाचा चांगला उत्साह दिसून आला. मुस्लीमबहुल वस्ती असलेल्या भिवंडी भागात सकाळपासून मतदारांच्या लागलेल्या लांबलचक रांगा चर्चेचा विषय ठरला होता. या मतदारसंघातील निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची ठरल्याने सकाळपासूनच भिवंडी, शहापूर, मुरबाड, बदलापूर, कल्याण पश्चिम पट्टय़ात भाजप, संघाचे कार्यकर्ते आक्रमकपणे मतदारांशी संपर्क साधताना दिसत होते. या मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये मात्र त्या प्रमाणात समन्वय दिसत नव्हता. कल्याण पश्चिम हा शिवसेनेचा बालेकिल्ला. या भागातील शिवसेनेच्या शाखा, शिवसेना कार्यकर्ते तुरळक प्रमाणात रस्त्यांवर दिसत होते.

पालघर : वर्षभरात १० टक्क्य़ांनी मतदानात वाढ

गेल्या वर्षी झालेल्या पालघर पोटनिवडणुकीच्या तुलनेत सुमारे १० टक्के मतदान वाढल्याने ही बाब बहुजन विकास आघाडी तसेच शिवसेनेच्या नेत्यांसाठी चिंतेचे कारण बनले आहे. या वाढीव मतदानावर निकालाची गणिते अवलंबून राहणार असून वाढलेल्या मतदानामागील कारणांचा शोध दोन्ही पक्ष घेऊ  लागले आहे.

पालघर लोकसभा मतदार संघासाठी सुमारे ६४  टक्के मतदान झाले. गेल्या वर्षी झालेल्या पोटनिवडणुकीत चार  प्रमुख पक्षांचे उमेदवार रिंगणात असताना जेमतेम ५३ टक्के मतदान झाले होते. या वेळी मतदान दहा टक्क्य़ांनी वाढले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2019 2:06 am

Web Title: mumbais voting percentage increased
Next Stories
1 जवान चंदू चव्हाणांविरोधात गुन्हा
2 मतदार घटल्याने पाच ठिकाणी टक्केवारी वाढली
3 देशात चौथ्या टप्प्यात ६४ टक्के मतदान
Just Now!
X