काही महिन्यांपूर्वी ७४ जणांचा बळी घेणाऱ्या शीळ-डायघर येथील घटना ताजी असतानाच शुक्रवारी पहाटे मुंब्रा स्थानकापासून हाकेच्या अंतरावर असलेली ‘स्मृती’ नावाची तीन मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत दहा जणांचा मृत्यू झाला, तर १४ जण गंभीर जखमी झाले. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहणारे शेख कुटुंबातील आठ जण या दुर्घटनेत जागीच मृत्युमुखी पडले. मृतांमध्ये सहा लहान मुलांचा समावेश आहे. ठाणे महापालिकेने नुकत्याच जाहीर केलेल्या धोकादायक इमारतींच्या यादीत या इमारतीचे नाव नव्हते. त्यामुळे मुंब््रयातील सर्वच इमारतींच्या दर्जाविषयी पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले जाऊ  लागले आहेत.
मुंब्रा स्थानकास लागूनच उभारण्यात आलेल्या वाहनतळास खेटूनच असलेल्या संजयनगर भागात ही इमारत उभी होती. तीन मजल्यांच्या या इमारतीत तळमजल्यावर दुकाने तर वरच्या मजल्यांवरील घरांमध्ये नऊ कुटुंबांचे वास्तव्य होते. शुक्रवारी पहाटे या इमारतीचे प्लॅस्टर मोठय़ा प्रमाणावर निखळले. तसेच भिंतींनाही हादरे जाणवण्यास सुरुवात झाली. इमारत खचत असल्याचे जाणवू लागताच जागे झालेल्या रहिवाशांची पळापळ सुरू झाली. मात्र इमारतीचा दुसरा मजला पूर्णपणे कोसळल्याने पहिल्या मजल्यावरील रहिवाशांचा बाहेर निघण्याचा मार्गच बंद झाला. पहिल्या मजल्यावरील काही रहिवासी तसेच तळमजल्यावरील दुकानात झोपलेले काही कर्मचारी बाहेर पडले. काही क्षणात इमारत पूर्णपणे कोसळली. मात्र पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या शेख कुटुंबातील आठ जणांसह आणखी दोघा जणांना बाहेर पडता आले नाही. इमारतीमधील रहिवाशांच्या किंकाळ्या आणि आक्रोश ऐकून परिसरातील रहिवाशांनी मदतीसाठी धाव घेतली. त्यानंतर रहिवासी आणि महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने घटनास्थळी धाव घेऊन ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य सुरू केले. राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक, मुंबईचे आपत्ती निवारण पथक, सिव्हिल डिफेन्सची पथकेही काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाली. बचावकार्य वेगाने सुरू झाल्यामुळे ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना मोठय़ा संख्येने बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले. दुपारी उशिरापर्यंत या इमारतीचा ढिगारा उपसण्याचे काम सुरू होते. मुंब्रा रेल्वे स्थानकास लागूनच उभारण्यात आलेल्या नव्या वाहनतळास खेटूनच ही इमारत उभी होती.
अधिकृत की अनधिकृत?  
ही दुर्घटनाग्रस्त इमारत मोकळ्या जागेवर असल्याने मदतकार्य करणे शक्य झाले. १९७९ मध्ये ग्रामपंचायतीच्या काळात या इमारतीचे बांधकाम करण्यात आले होते. त्यामुळे ही इमारत अधिकृत की अनधिकृत होती, याविषयी कोणतीही कागदपत्रे महापालिकेकडे उपलब्ध नाहीत. तसेच ३४ वर्षे जुनी असलेली ही इमारत महापालिकेच्या धोकादायक इमारतींच्या यादीतही नव्हती, यास महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दुजोरा दिला आहे.