छोटय़ा वाहनांसाठी कमी मार्गिका; टोलमुक्तीचा आनंद खड्डय़ांनी हिरावला

ठाणे : मुंब्रा बाह्य़वळण रस्त्याच्या कामामुळे होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी राज्य सरकारने मुलुंड आणि ऐरोली टोलाक्यांवरील वसुली थांबविण्याचा निर्णय घेतल्याने मंगळवारी सकाळी गर्दीच्या वेळी वाहनचालकांना काहीसा दिलासा मिळाला. परंतु त्यानंतर मात्र टोलनाक्यावर हलक्या वाहनांसाठी जेमतेम दोन ते तीन मार्गिका मोकळ्या ठेवल्याने अवजड वाहनांच्या गर्दीत हलकी वाहने खोळंबली होती.

दोन्ही टोलनाक्यांवर तीन ते चार मार्गिका अवजड वाहनांसाठी मोकळ्या करून देण्यात आल्याने हलक्या वाहनांची अक्षरश अडवणूक सुरूहोती. दरम्यान, टोलनाक्यांलगत असलेल्या रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांमुळे वाहने मंदगतीने सरकत होती. त्यामुळे टोलमुक्तीचा आनंद खड्डयांनी हिरावल्याची प्रतिक्रिया प्रवाशांमधून उमटत होत्या.

ऐरोली आणि मुलुंड टोलनाक्यावरील टोलमुक्तीचा निर्णय मध्यरात्रीपासून अंमलात येताच येथील वाहतूक पुर्वीपेक्षा अधिक वेगाने सुरू असल्याचे चित्र सकाळपर्यत होते. एरवी पहाटेच्या सुमारास टोलनाक्यांवर वाहनांची गर्दी होते. परंतु मंगळवारी तसे चित्र दिसले नाही. सकाळी गर्दीच्या वेळेतही येथून पुर्वीपेक्षा कमी वेळेत वाहने पुढे सरकत होती. अकरा वाजल्यानंतर मात्र टोलनाका व्यवस्थापनांनी अवजड वाहनांसाठी अतिरिक्त मार्गिका मोकळ्या करून देण्यास सुरुवात केली.

या ठिकाणी अवजड वाहनांकडून टोल वसुली सुरू आहे. त्यामुळे या वाहनांच्या रांगा लागत असल्याचे कारण पुढे करत या मार्गिका वाढविण्यात आल्या. त्यामुळे टोल भरणा नसल्याने अडथळ्याविना प्रवासाच्या अपेक्षेने आलेल्या हलक्या वाहनांतील प्रवासी अवजड वाहनांच्या मागे अडकून पडले. टोलबंदीचा निर्णय होण्यापुर्वी मुलुंड आणि ऐरोली टोलनाक्यांवर किमान चार मार्गिका हलक्या वाहनांसाठी मोकळ्या ठेवण्यात येत होत्या. मंगळवारी या मार्गिकांवरून अवजड वाहनांना वाट मोकळी करून देण्यात आल्याने हलकी वाहने खोळंबली. टोलनाका व्यवस्थापनाच्या या निर्णयाबद्दल वाहनचालक नाराजी व्यक्त करीत होते.

खड्डयांचे दुखणे कायम

ऐरोली आणि मुलुंड मार्गावरील रस्त्याची दुर्दशा झाल्याने टोलमुक्तीचा आनंद पुढे खड्डयांनी हिरवल्याचे दिसत होते. ठाण्यातील माजीवाडा पूलापासून ते आनंदनगर टोलनाक्यापर्यंतच्या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनकोंडीत भर पडत आहे. कोपरी ते मुलुंड पुलापर्यंतच्या रस्त्यावरही मोठय़ा प्रमाणावर खड्डे आहेत. काही दिवसांपूर्वी ठाणे महापालिकेने अधिकाऱ्यांच्या सुट्टय़ा रद्द् करून जुलैमध्ये खड्डे भरण्याची कामे हाती घेण्यात आली होती. परदेशी तंत्रज्ञान वापरून पालकमंत्री एकनाथ िशदे यांनी खड्डे बुजविण्याचे प्रात्यक्षिक दाखविले होते. हे प्रयत्न मंगळवारच्या पावसाने फोल ठरविले

ऐरोली खाडी पूल ते भांडुप पंपिंग मार्गावर कोंडी

मंगळवारपासून टोलमुक्ती जाहीर झाल्यानंतही ऐरोली टोलनाक्याजवळ एरोलीहून मुंबई, ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. ऐरोली टोलनाक्यावर कमी मार्गिका असल्यामुळे टोलमुक्त हलक्या वाहनांना पुढे जाता येत नव्हते. अवजड वाहने टोल भरत असल्याने हलक्या वाहनांचा खोळंबा होत होता. परिणामी टोलनाक्यावर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. दरम्यान मुलुंड ऐरोली वळण चौकातील अधिक कालावधीचा सिग्नल वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरत असल्याचे वाहनचालकांनी सांगितले.

महामार्गावर पडलेल्या खड्डय़ांची दुरुस्ती हे आमचे काम आहे. आनंदनगर भागातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्याचे आदेश संबधित अधिकाऱ्यांना देण्यात येतील.

-के. पी. पाटील, अधिक्षक अभियंता,सार्वजनिक बांधकाम विभाग

टोलनाक्यांवर मार्गिकांची कमतरता असल्याचे जाणवत आहे. यावर उपाय म्हणून जुन्या जकात नाक्यांच्या बाजूला काही मार्गिका वाढवता येतात, का यावर विचार सुरू आहे.

– शैलेंद्र बोरसे, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ