शुक्रवारी पहाटे मुंब्रा स्थानकाजवळ घडलेल्या  ‘स्मृती’ इमारत दुर्घटनेमुळे मुंब्रा शहरावर शोककळा पसरली आहे. मुंब्रा स्थानकाजवळील संजयनगर भागात ‘स्मृती’ इमारत होती. तीन मजल्यांच्या या इमारतीत तळमजल्यावर दुकाने तर वरच्या मजल्यांवरील घरांमध्ये नऊ कुटुंबांचे वास्तव्य होते. शुक्रवारी पहाटे या इमारतीचे प्लॅस्टर मोठय़ा प्रमाणावर निखळले. तसेच भिंतींनाही हादरे जाणवण्यास सुरुवात झाली. इमारत खचत असल्याचे जाणवू लागताच जागे झालेल्या रहिवाशांची पळापळ सुरू झाली. मात्र इमारतीचा दुसरा मजला पूर्णपणे कोसळल्याने पहिल्या मजल्यावरील रहिवाशांचा बाहेर निघण्याचा मार्गच बंद झाला. पहिल्या मजल्यावरील काही रहिवासी तसेच तळमजल्यावरील दुकानात झोपलेले काही कर्मचारी बाहेर पडले. काही क्षणात इमारत पूर्णपणे कोसळली. मात्र पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या शेख कुटुंबातील आठ जणांसह आणखी दोघा जणांना बाहेर पडता आले नाही. इमारतीमधील रहिवाशांच्या किंकाळ्या आणि आक्रोश ऐकून परिसरातील रहिवाशांनी मदतीसाठी धाव घेतली. त्यानंतर रहिवासी आणि महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने घटनास्थळी धाव घेऊन ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य सुरू केले. राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक, मुंबईचे आपत्ती निवारण पथक, सिव्हिल डिफेन्सची पथकेही काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाली. बचावकार्य वेगाने सुरू झाल्यामुळे ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना मोठय़ा संख्येने बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले. दुपारी उशिरापर्यंत या इमारतीचा ढिगारा उपसण्याचे काम सुरू होते. मुंब्रा रेल्वे स्थानकास लागूनच उभारण्यात आलेल्या नव्या वाहनतळास खेटूनच ही इमारत उभी होती. मुंब््रयात दाटीवाटीने उभ्या असलेल्या इमारतींच्या तुलनेत ही दुर्घटनाग्रस्त इमारत मोकळ्या जागेवर असल्याने मदतकार्य करणे शक्य झाले.
१९७९ मध्ये ग्रामपंचायतीच्या काळात या इमारतीचे बांधकाम करण्यात आले होते. त्यामुळे ही इमारत अधिकृत की अनधिकृत होती, याविषयी कोणतीही कागदपत्रे महापालिका प्रशासनाकडे उपलब्ध नाहीत. तसेच ३४ वर्षे जुनी असलेली ही इमारत महापालिकेच्या धोकादायक इमारतींच्या यादीतही नव्हती, यास महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दुजोरा दिला आहे.

शेख कुटुंबियांवर काळाचा घाला
इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहणारे अब्दुल शेख आणि मकदुम शेख या दोन भावांचे संपूर्ण कुटुंब या अपघातात मरण पावले. गेल्या दहा वर्षांपासून शेख बंधु आपल्या कुटुंबीयांसोबत एकत्र राहत होते. अब्दुल विक्रोळी येथे बुट विक्रीच्या दुकानात काम करीत होते तर मकदुम हे मुंब्रा भागात फळ-भाजी विक्रीचा व्यवसाय करीत होते. या अपघातात मरण पावलेल्या दहा जणांपैकी आठ जण शेख कुटुंबीय आहेत. इमारत खचू लागल्यानंतर फरीदा शेख या शाकिर आणि तस्मीया या लहान मुलांना कडेवर घेऊन इमारतीबाहेर पडण्याचा प्रयत्न करीत होत्या. त्याचवेळी इमारतीचा स्लॅब अंगावर कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. इमारतीचा मलबा काढताना ही मायलेकरे त्याच स्थितीमध्ये आढळून आली.  

शीळ-डायघर इमारत दुर्घटना ; चौघांचे जामीन अर्ज नामंजूर
ठाणे : शीळ-डायघर येथील लकी कंपाऊंडमधील इमारत दुर्घटनेप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादीचे निलंबित नगरसेवक हिरा पाटील यांच्यासह चौघांचे जामीन अर्ज ठाणे न्यायालयाने शुक्रवारी नामंजूर केले. या इमारत दुर्घटनेमध्ये ७४ निष्पापांचा मृत्यू झाल्यानंतर ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने एकूण २२ आरोपींना अटक केली होती. त्यामध्ये हिरा पाटील, पत्रकार रफिक कामदार, दलाल सय्यद जब्बार पटेल आणि वास्तुविशारद फारूक छाबरा यांचा समावेश होता. सध्या हे चौघेही ठाणे मध्यवर्ती कारागृहात आहेत. या चौघांनी मे महिन्यामध्ये जामीन मिळण्यासाठी ठाणे न्यायालयात अर्ज दाखल केला होता. दरम्यान, या प्रकरणाचे आरोपपत्र अद्याप न्यायालयामध्ये दाखल झालेले नाही. तसेच बहुतेक साक्षीदार आता पुढे येऊ लागले आहेत. त्यामुळे या प्रकरणाच्या तपास अद्याप सुरू असून त्यामध्ये अडथळे येऊ नयेत, यासाठी या चौघाचेही जामीन अर्ज नामंजूर करावेत, असा युक्तीवाद सरकारी वकील हेमलता देशमुख यांनी न्यायालयामध्ये या अर्जासंबंधी झालेल्या सुनावणीच्यावेळी केला होता. दरम्यान, ठाणे न्यायालयाचे अतिरीक्त सत्र न्यायाधीश के. आर. वॉरियर यांच्या न्यायालयात शुक्रवारी या चौघांच्या जामीन अर्जावर अंतिम सुनावणी झाली. त्यामध्ये या चौघांचेही जामीन अर्ज नामंजूर करण्यात आले.  

कायद्याचा चाप
* महापालिका उपायुक्त दीपक चव्हाण, श्रीकांत सरमोकादम, सहाय्यक आयुक्त श्याम थोरबोले यांच्यासह वरिष्ठ व कनिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा अटक आरोपीमध्ये समावेश.
* राष्ट्रवादी पक्षाचा निलंबित नगरसेवक हिरा पाटीलही अटकेत.
* यातील बहुतांश आरोपींचे जामीन अर्ज ठाणे न्यायालयाने फेटाळले.
*  महापालिकेचे कर्मचारी रामदास बुरूड आणि दलाल अन्सारी हे दोघेच जामीनावर सुटले.
* उर्वरीत २० आरोपी ठाणे कारागृहात.
*  या दुर्घटनेप्रकरणी येत्या सोमवापर्यंत ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी ठाणे न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्याची शक्यता.
* सुमारे एक लाख पानांचे आरोपपत्र.

मृतांची नावे..
करीम शेख (३५), मकदुम शेख (२९), फरीदा करीम शेख (२७), शाकिर करीम शेख (७), तस्मीया करीम शेख (५), आलिया मकदुम शेख (२६), हुसना मकदुम शेख (४), हमजा मकदुम शेख (५ महिने), महेक पंजाबी (२ महिने), फरीदा करिम शेख (२४)
 
जखमींची नावे
मोहम्मद जिलानी फारुक (३२), शबनम इफ्तेकीर फकीर (२१), सालीया इफ्तेकीर फकीर (२६), नुर फातीमा जिलानी फारुक (९) राजीव वसंत (१९), शहनाज इक्बाल शेख (४५), फरहान दिलांवर वाघु (३५), यासिम नकलाउद्दीन लाला (५०), नेहा शेख (१७), लुबाना पंजाबी (२५), नदीम फकिर (१७), इक्तेकार फकीर (५४), नसीर कादीर (२६), जमिर एल फातमा (२७),  

शीळ इमारत दुर्घटनेनंतर अडीच महिन्यात काय घडले ?
* ४ एप्रिल २०१३ रोजी शीळ येथील लकी कंपाऊंडमधील इमारत कोसळली
* अपघातात ७४ जणांचा मृत्यू तर ६९ जखमी
* ठाणे महापालिका उपायुक्तांसह २२ जणांना अटक
*  पोलीस हवालदार तसेच राष्ट्रवादीचा नगरसेवक हिरा पाटीलही अटकेत
*  डायघरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. पी. नाईक निलंबित
* धोकादायक तसेच अनधिकृत बांधकामाविरोधात कारवाईला सुरूवात
* सुमारे एक हजार धोकादायक तर ५७ धोकादायक इमारतींची यादी जाहीर
* सर्व पक्षीय नेत्यांचा कारवाईला विरोध – ठाणे बंद
* धोकादायक रहिवाशांच्या नावाने शरद पवारही मैदानात अन् मुख्यमंत्र्यांना दिले पत्र
* पाच हजार बेकायदा बांधकामांना महापालिकेच्या नोटीसा, काही ठिकाणी कारवाईही सुरू
* सर्व पक्षीय नेते, रहिवाशी कारवाईविरोधात रस्त्यावर, संघर्ष टिपेला
* धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय
* मे महिन्याच्या सुरूवातीस एमएमआरडीएच्या रेन्टल हॉउसिंग घरांमध्ये स्थलांतरचा निर्णय
* संक्रमण शिबीरात १६० चौरस फुट आकाराची घरे देण्याचा निर्णय
* जूनच्या पहिल्या आठवडय़ात वर्तकनगर येथील १५०० घरांचे ठाणे महापालिकेस हस्तांतरण
* संक्रमण इमारतींच्या उभारणीसाठी ठाणे महापालिकेचा २० हजार घरांचा प्रस्ताव
* जूनच्या दुसऱ्या आठवडय़ात पुनर्वसन धोरणाची चर्चा सूरू पण, अद्याप ते कागदवरच
*  शुक्रवार, २१ जून रोजी मुंब्य्रात इमारत कोसळून दहा जण ठार