नव्या अ‍ॅपवर आठ वाहनतळांचे आरक्षण; तीन महिन्यांत सुविधेला सुरुवात

वाहनतळांवर वाहने उभी करण्यासाठी येणाऱ्यांची कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांकडून होणारी लूटमार रोखण्यासाठी, वाहनतळांवर पालिकेचे नियंत्रण राहावे आणि वाहनचालकांना चांगली सुविधा मिळावी यादृष्टीने दक्षिण मुंबईमधील आठ वाहनतळांवर वाहने उभी करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने जागेचे आरक्षण करण्याची सुविधा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी अ‍ॅपचा आधार घेण्यात येणार आहे. वाहन उभे करण्यासाठी जागा शोधत फिरणाऱ्या वाहनचालकांचा त्रास या अ‍ॅपमुळे दूर होणार असून त्यांना वाहनतळांवर पोहोचण्यापूर्वीच गाडी उभी करण्यासाठी जागा आरक्षित करता येणार आहे.

पालिकेने दक्षिण मुंबईत अनेक ठिकाणी सार्वजनिक वाहनतळ सुरू केले आहेत. परंतु हे वाहनतळ सदैव वाहनांनी व्यापलेले असतात. त्यामुळे वाहनचालकांना पार्किंगसाठी शोधाशोध करावी लागते. या पाश्र्वभूमीवर वाहनतळांचे ऑनलाइन आरक्षण करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. येत्या तीन महिन्यांत अ‍ॅपआधारित वाहनतळ आरक्षणाची सुविधा सुरू करण्यात येईल. आयुक्त अजोय मेहता व पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या सुविधेची नुकतीच चाचणी करण्यात आली.

या आठ वाहनतळांवर कॅमेरे बसविण्यात येणार असून कॅमेराच्या छायाचित्रणाचे संगणकीय पद्धतीने विश्लेषण होऊन त्याची माहिती अ‍ॅपवर उपलब्ध होणार आहे. वाहनचालकाला कोणत्या वाहनतळावर वाहन उभे करण्यासाठी जागा उपलब्ध आहे याची माहिती अ‍ॅपवर मिळू शकेल. त्यानुसार कोणत्या वाहनतळावर आपले वाहन उभे करायचे याचा निर्णय तो घेऊ शकेल. वाहन उभे करण्यासाठी वाहनचालक ऑनलाइन आरक्षणही करू शकणार आहे. आरक्षण केल्यानंतर वाहनचालकाला मोबाइलवर वाहनतळाचा अ‍ॅपच्या माध्यमातून पत्ता, जागा क्रमांक, बुकिंगचा कालावधी, वाहनक्रमांक आदी तपशील असलेला एसएमएस पाठविण्यात येणार आहे. तो एसएमएस संबंधित वाहनतळावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यालाही पाठविण्यात येणार आहे. वाहनचालकाला अ‍ॅपद्वारे वाहनतळापर्यंत जाण्याचा मार्ग जीपीएसच्या माध्यमातून दिसू शकेल हे विशेष. वाहनतळावर पोहोचल्यानंतर तेथील कर्मचारी एसएमएसची पडताळणी करून वाहन उभे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देईल. मात्र नियोजित वेळेत वाहन वाहनतळावर पोहोचू शकले नाही, तर त्याचे आरक्षण आपोआप रद्द होऊन ती जागा दुसऱ्याला उपलब्ध करण्यात येईल. जागेसाठी आरक्षण केलेले वाहन वाहनतळावर कधी आले आणि तेथून कधी बाहेर पडले यांच्याही नोंदी अ‍ॅपवर होणार असून आरक्षण केलेल्या वेळेपेक्षा अधिक काळ वाहनतळावर वाहन उभे केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांकडून अतिरिक्त शुल्क वसूल करण्यात येणार आहे. वाहनतळावर नियमित वाहन उभे करण्यासाठी येणाऱ्यांना ‘आरएफआयडी टॅग’ सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.

हा टॅग असलेले वाहन वाहनतळावर येताना आणि बाहेर जाताना आपोआप फाटक उघडेल. जेवढा वेळ वाहन वाहनतळावर उभे असेल तेवढय़ा कालावधीचे पैसे वाहनधारकाच्या संबंधित खात्यातून पालिकेच्या अथवा कंत्राटदाराच्या खात्यात वळते होतील.ऑनलाइन आरक्षण पद्धतीमुळे किती वाहनचालकांनी वाहनतळांचा लाभ घेतला याची माहिती पालिकेला सहजगत्या उपलब्ध होऊ शकणार आहे. त्यामुळे वाहनतळांवर पालिकेला नियंत्रण ठेवणेही सहजगत्या शक्य होणार आहे, असे ‘ए’ विभाग कार्यालयाचे साहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी सांगितले.

कुठे, किती पार्किंग?

  • महात्मा जोतिबा फुले मंडई (क्रॉफर्ड मार्केट)जवळील तीन वाहनतळांवर २२२
  • हुतात्मा चौकातील दोन वाहनतळांवर १४७
  • काळाघोडाजवळ ५०
  • इरॉस जंक्शनमध्ये ४२
  • रीगल सर्कलमध्ये २४