17 July 2019

News Flash

CSMT Fob Collapse: २४ तासात अहवाल द्या, महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांचा आदेश

अजॉय मेहता यांनी ऑडिट, सुचवलेली दुरुस्ती याबाबत माहिती देण्यास बजावलं आहे

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाजवळील पूल दुर्घटनेसंबंधी २४ तासात अहवाल द्या असा आदेश महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी दिला आहे. दक्षता विभागाला हा आदेश देण्यात आला आहे. अजॉय मेहता यांनी ऑडिट, सुचवलेली दुरुस्ती याबाबत माहिती देण्यास बजावलं आहे. याआधी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुर्घटनेची प्राथमिक जबाबदारी कोणाची हे निश्चित करा असा आदेश अजॉय मेहता यांना दिला होता. मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना संध्याकाळपर्यंत अहवाल सादर करण्यासंही सांगितलं आहे.

महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी मुख्य अभियंता (दक्षता विभाग) यांना पूल दुर्घटनेची चौकशी करत २४ तासात प्राथमिक अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे. यामध्ये दुर्घटनेसाठी जबाबदार महापालिका कर्मचाऱ्यांची ओळख पटवण्यास सांगण्यात आलं आहे. तसंच यामध्ये स्ट्रक्चरल ऑडिटरची भूमिका काय होती याचीही पाहणी करण्यास सांगितलं आहे. याशिवाय पूल दुर्घटनेची कारणं, पूलाची देखभाल परिस्थिती आणि स्ट्रक्चरल ऑडिट याचीही अहवालात माहिती मागवण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेंट जॉर्ज रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की, ‘ही अतिशय दुर्दैवी दुर्घटना आहे. रुग्णालयात १० जण दाखल असून एक रुग्ण आयसीयूत आहे. मात्र सध्या ते धोक्याबाहेर आहेत. चौकशीचे आदेश तर देण्यात आले आहेतच पण याशिवाय घटनेला प्राथमिक जबाबदार कोण आहे? याबाबत आज संध्याकाळपर्यंत अहवाल सादर करण्याचे महापालिका आयुक्तांना आदेश देण्यात आले आहेत’.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतरही जर अशी दुर्घटना होत असेल तर प्रश्नचिन्ह उपस्थित होतो असं म्हटलं. ऑडिट करताना ज्यांनी हिरवा कंदील दाखवला असेल त्यांच्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ज्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं आहे त्यांची पुनर्तपसाणी करावी लागेल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

First Published on March 15, 2019 1:11 pm

Web Title: municipal commisioner ajoy mehta asks to submit report on csmt bridge collapse