News Flash

विकासकांना मदत करणाऱ्या अधिकारी आणि नेत्यांना चाप

परवानगीसाठी शिफारसकर्त्यांच्या नावाची फाइलमध्ये नोंद करा : आयुक्त

परवानगीसाठी शिफारसकर्त्यांच्या नावाची फाइलमध्ये नोंद करा : आयुक्त

इमारत मंजुरी, इमारत पूर्णत्वाचा दाखला अथवा भोगवटा प्रमाणपत्र देण्यासाठी विकासक अथवा नियुक्त वास्तुविशारदाव्यतिरिक्त  शिफारस करणाऱ्या अन्य व्यक्तीच्या नावासह संपूर्ण माहितीची नोंद इमारत प्रस्तावाबाबतच्या फाइलमध्ये करावी, असे सक्त आदेश पालिका आयुक्त अजय मेहता यांनी दिले आहेत. त्यामुळे विकासकांचे लांगुलचालन करणारे राजकीय नेते, सरकारी वा पालिका अधिकारी, समाजसेवेचा बुरखा पांघरलेल्या व्यक्ती, दलालांना चाप बसणार आहे.

कायदेशीर बाबी पूर्ण न केल्यामुळे बांधून तयार असलेल्या अनेक इमारतींमध्ये मूळ आणि नव्या रहिवाशांना वास्तव्यास जाता येत नाही. त्यामुळे राजकीय नेते, सरकारी वा पालिका अधिकारी, विभागातील समाजसेवक, पालिकेत इमारत प्रस्ताव विभागात पालिका अधिकाऱ्यांभोवती पिंगा घालणारे दलाल आदी मंडळींकडून इमारतीला पूर्णत्वाचा दाखला अथवा भोगवटा प्रमाणपत्र देण्याबाबत संबंधित पालिका अधिकाऱ्यावर विविध मार्गाने दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. काही वेळा पैसे अथवा वस्तूंचे आमिषही दाखविले जाते. नव्या इमारतीला मंजुरी देण्यासाठीही असेच प्रकार पालिकेत घडतात. परिणामी, कायदेशीर बाबींची पूर्तता होण्यापूर्वीच इमारत मंजुरी, इमारत पूर्णत्वाचा दाखला अथवा भोगवटा प्रमाणपत्र दिले जाते. मात्र भविष्यात त्रुटी लक्षात आल्यानंतर पालिकेकडून संबंधित इमारतींमधील रहिवाशांवर कारवाईचा बडगा उगारला जातो. असे प्रकार भविष्यात घडू नयेत म्हणून आयुक्तांनी परिपत्रक जारी केले आहे.

विकासक, इमारत पुरस्कर्ता अथवा नियुक्त वास्तुविशारदाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तीने इमारत मंजुरी, इमारत पूर्णत्वाचा दाखला किंवा भोगवटा प्रमाणपत्र देण्यासाठी केलेली शिफारस वा निवेदन, संदर्भ, दूरध्वनी क्रमांक, वेळ व नाव याबाबत इमारत प्रस्तावाबाबतच्या फाइलमध्ये करावी, असे सक्त आदेश मेहता यांनी या परिपत्रकात दिले आहेत.

इमारत प्रस्तावाबाबत संबधित असलेल्या सर्व विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हे परिपत्रक पाठविण्यात आले असून त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 25, 2016 12:12 am

Web Title: municipal commissioner ajoy mehta
Next Stories
1 प्रवाशांच्या हाकेला लोहमार्ग पोलिसांचा ‘प्रतिसाद’!
2 दहावी कलमापन चाचणीचा आज निकाल
3 फक्त लक्ष वेधण्यासाठी कन्हैयाने रचला हल्ल्याचा बनाव, कथित हल्लेखोराचा दावा
Just Now!
X