मुंबईमधील दाटीवाटीने वसलेल्या झोपडपट्टी परिसरात आग लागल्यास त्यावर पाण्याची फवारणी करता यावी यासाठी पाण्याचे नळखांब (हायड्रंट) उभारण्याची मागणी पालिका प्रशासनाने फेटाळून लावली आहे. झोपडपट्टी परिसरात लावण्यात येणाऱ्या नळखांबांचा गैरवापर होऊ शकतो, तसेच झोपडपट्टी परिसरात नळखांबांना पुरेशा दाबाने पाणी उपलब्ध होऊ शकणार नाही, अशी कारणे देत ही मागणी फेटाळून लावली आहे.
कांदिवली येथील दामू नगर झोपडपट्टीत आग लागताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी वेळीच पोहोचू शकले नव्हते. त्यामुळे झोपडय़ा आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आणि अनेकांचे संसार रस्त्यावर आले. या घटनेची दखल घेऊन नगरसेवक राम आशीष गुप्ता यांनी झोपडपट्टय़ांमध्ये नळखांब उभारण्याची मागणी ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती. झोपडपट्टय़ांमध्ये दाटीवाटीने झोपडय़ा उभ्या असतात. अत्यंत अरुंद वाटांमधून झोपडपट्टीवासीयांना घर गाठावे लागते. अशा ठिकाणी जलवाहिनी टाकणे अवघड बनते. परिणामी, तेथे नळखांब उभारणे शक्य होणार नाही, असे प्रशासनाने या ठरावाच्या सूचनेवर दिलेल्या अभिप्रायात स्पष्ट केले आहे.
मुंबईमध्ये ठिकठिकाणी ठरावीक वेळी पाणीपुरवठा केला जातो. नळखांबांना मोठय़ा दाबाने पाणीपुरवठा होऊ शकला तरच आग विझविण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर पाणीपुरवठा होऊ शकतो. ते सध्याच्या परिस्थितीत शक्य नाही. मुंबईत पालिकेची १८ जलभरणा केंद्रे असून आगीची दुर्घटना घडल्यास या जरभरणा केंद्रांत टँकरमध्ये पाणी भरण्याची व्यवस्था आहे. त्यामुळे झटपट पाणी भरून टँकर घटनास्थळी पोहोचू शकतील व आग विझविण्यासाठी मदत होईल. झोपडपट्टय़ांमध्ये नळखांब उभारल्यास त्याचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिथे नळखांब उभारणे शक्य नाही, असे जल विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.