संदीप आचार्य 
मुंबईसह राज्यात करोना रुग्ण वेगाने वाढत आहेत. मुंबईतील वाढते रुग्ण आणि मास्क न लावणे आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन न करण्याची प्रवृत्ती लक्षात घेऊन महापालिकेने आता २०० रुपये दंड ठोठावण्यास सुरुवात केली आहे.

मुंबईत दोन आठवड्यापूर्वी करोना रुग्णांची रोजची संख्या हजार हे बाराशे होती. मात्र गेल्या काही दिवसात ती पुन्हा वाढून आज दोन हजारापेक्षा करोना रुग्ण आढळू लागले आहेत. मुंबईत आजपर्यंत १,६३,१२५ करोना रुग्णसंख्या नोंदविण्यात आली असून आतापर्यंत करोनामुळे ८०२३ जणांचे मृत्यू झाले आहेत. मुंबईत करोना रुग्णांसाठी १२३३७ बेड असून अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २६,६२९ एवढी आहे. गणेशोत्सवानंतर तसेच अनलॉक मुळे मुंबईतील करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. मुंबईत अनेक भागात आज लोक मास्क न वापरता फिरत आहेत.

सोशल डिस्टंसिंगचा बट्याबोळ झाला आहे. बाजारात, दुकानांमध्ये पूर्वीप्रमाणेच गर्दी दिसत आहे. यातून मुंबईत नव्याने करोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी याची गंभीर दखल घेत मास्क न वापरणारे व सोशल डिस्टंसिंगचे पालन न करणाऱ्यांना २०० रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेचे उपायुक्त व सहाय्यक आयुक्तांची बैठक घेऊन वॉर्ड निहाय मास्क न लावणार् यांवर जास्तीतजास्त कारवाई करण्याचे आदेश आयुक्त चहल यांनी दिले आहेत. किमान पाच हजार जणांवर रोज कारवाई केली तर लोकांमध्ये काही शिस्त निर्माण होईल असे आयुक्त चहल यांनी सांगितले. यासाठी ‘क्लिनअप’ची स्वतंत्र यंत्रणाच निविदा काढून कामाला लावण्यात येणार असून सध्या ही जबाबदारी पालिकेच्या घनकचरा विभागाच्या ५०० कर्मचार्यांवर सोपविण्यात आली आहे. प्रत्येक सहाय्यक पालिका आयुक्तांनी रोज किती लोकांवर कारवाई केली पाहिजे ते निश्चित करण्यात आल्याचे पालिकेच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

पिंपरी- चिंचवड महापालिका क्षेत्रात मास्क न लावणारे व सोशल डिस्टंसिंगचे पालन न करणार्यांवर यापूर्वी ५०० रुपये दंड होता तो वाढवून १००० रुपये करण्यात आल्याकडे लक्ष वेधले असता गरज भासल्यास मुंबईतही दंड वाढवला जाईल, असे आयुक्त चहल म्हणाले