महापालिकेच्या आरोग्य विभागाचे रुग्णालयांना आदेश

मुंबई : रुग्णांची संख्या वाढू लागल्याने लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांनी खाटा व्यापू नयेत, अशा सूचना पालिकेने रुग्णालयांना पुन्हा द्याव्या लागल्या आहेत. रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढत असून गंभीर रुग्णांना खाटा कमी पडू नयेत म्हणून रुग्णांना घरी पाठवण्याबाबत आधीच असलेल्या धोरणाची पालिकेने आठवण करून दिली आहे.

जून महिन्यात जेव्हा मुंबईतील रुग्णांची संख्या वेगाने वाढत होती, त्यावेळी गंभीर रुग्णांना खाटा मिळणे अवघड बनले होते. त्यावेळी आयसीएमआरच्या नियमानुसार रुग्णांना घरी सोडण्याबाबत धोरण तयार करण्यात आले होते. लक्षणे नसलेल्या रुग्णांना किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांच्या शरीराचे तापमान आणि प्राणवायूची पातळी नियमित तपासली जावी. तीन दिवसांपर्यंत रुग्णाला ताप नसेल आणि प्राणवायूची पातळीही ९५ पेक्षा जास्त असेल तर अशा रुग्णांना १० दिवसांनंतर रुग्णालयातून घरी पाठवता येईल. घरी पाठवताना त्यांची करोना चाचणीही करण्याची आवश्यकता नाही, असे पालिकेने सूचित केले आहे.

ज्या रुग्णाचा तीन दिवसांनीही ताप उतरणार नाही. तसेच ज्यांना प्राणवायू देण्याची गरज आहे, अशा रुग्णांना पूर्ण बरे होईपर्यंत रुग्णालयात ठेवावे, असेही या धोरणात म्हटले आहे. घरी गेल्यानंतर एखाद्या रुग्णाला पुन्हा लक्षणे जाणवल्यास त्यांना पुन्हा करोना उपचार केंद्रात दाखल करता येईल. रुग्णाला घरी पाठवल्यानंतरही १४ दिवसांपर्यंत दूरध्वनीवरून त्याच्या प्रकृतीचा पाठपुरावा करावा, असे या धोरणात म्हटले आहे. जून महिन्यात आलेले हे धोरण पालिकेने पुन्हा एकदा रुग्णालयांच्या माहितीसाठी पाठवले आहे. सप्टेंबर महिन्यात रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे गरज असलेल्या रुग्णांना खाटा कमी पडू नये यासाठी रुग्णालयांना या धोरणाची आठवण करून दिल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

पुन्हा गरज का?

विशेषत: खासगी रुग्णालयात अशा सौम्य लक्षणे किंवा लक्षणे नसलेल्या रुग्णांनी खाटा व्यापल्याच्या घटना घडतात. त्यामुळे त्यांच्या माहितीसाठी हे धोरण पुन्हा त्यांच्या लक्षात आणून दिल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. आरोग्य मंत्रालयाच्या नियमावलीनुसार हे धोरण जुनेच आहे. मात्र रुग्णालयांकडून त्याची अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे. लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी खाटा व्यापू नयेत, असेही निर्देश दिले असल्याची माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी मंगला गोमारे यांनी दिली.