कुर्ला पूर्व येथे झोपु योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या इमारतीमध्ये मंडईसाठी राखीव ठेवलेल्या जागेवर पाच वर्षे झाले तरी पालिकेने मंडई सुरू केलेली नाही. या इमारतीमध्ये जागा राखीव ठेवायला लावून पालिकेने विकासकाकडून मंडई तयार करून घेतली होती. परंतु, गेल्या पाच वर्षांत मंडई सुरू करण्यात पालिकेने स्वारस्य न दाखविल्याने ही जागा मोठय़ा दुरवस्थेत आहे. आता मंडईऐवजी पालिकेने याठिकाणी एखादे रुग्णालय सुरू करावे, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

संपूर्ण झोपडपट्टी परिसर असलेल्या कुर्ला पूर्व परिसरात २००६ला ही योजना सुरू झाली. निता डेव्हलपर्स या विकासकाने या ठिकाणी इमारत बांधण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्याने पालिकेकडून रीतसर परवानगी घेतली. मात्र या झोपडपट्टीमधील काही जागा मंडईसाठी राखीव असल्याने इमारतीचे दोन मजले मंडईसाठी देण्याची अट पालिकेने घातली. तसेच वाहने उभी करण्यासाठीदेखील जागा सोडण्याच्या सूचना पालिकेने विकासकाला केल्या. त्यानुसार विकासकाने तळमजला आणि पहिला मजला यावर मंडईसाठी मोकळी जागा सोडली. तसेच इमारतीच्या खाली काही जागा वाहनांकरिता सोडण्यात आली. २०१२ ला कुर्ला जयहिंद बुद्ध विकास या इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन रहिवाशी याठिकाणी राहण्यास देखील आले. त्यानंतर पाच वर्ष उलटूनदेखील पालिकेने ही मंडई सुरू केली नसल्याने सध्या या मंडईची मोठी दुरवस्था झाली आहे.

पालिकेच्या या मंडईमुळे येथील रहिवाशांना इमारतीत जाण्यासाठी लहानसा प्रवेशद्वार ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आगीसारखी एखादी घटना घडल्यास मोठी हानी होण्याची भीती रहिवाशांना आहे.

परिसरात मोठय़ा प्रमाणात दुकाने असल्याने या ठिकाणी या मंडईची गरज नाही. त्यापेक्षा याठिकाणी एखादे प्रसूतिगृह अथवा रुग्णालय उघडल्यास याचा मोठा फायदा येथील रहिवाशांना होणार आहे. तसे पत्र अनेकदा येथील रहिवाशांनी पालिकेला दिले आहे. मात्र पालिकेकडून या ठिकाणी कानाडोळा केला जात असल्याचा आरोप रहिवासी करत आहेत.

त्यातच पालिकेने या मंडईच्या देखीभालीसाठी एकही सुरक्षारक्षक ठेवलेला नाही. त्यामुळे वाहनतळाच्या ठिकाणी रात्री मोठय़ा प्रमाणात गर्दुल्ले नशा करण्यासाठी येतात. परिणामी या ठिकाणी एखादी मोठी दुर्घटनादेखील होण्याची भीती रहिवाशांना आहे. त्यामुळे पालिकेने तत्काळ याठिकाणी लक्ष घालावे अशी मागणी रहिवाशी करत आहेत.

‘या मंडईत शहरातील विविध प्रकल्पामध्ये बाधित असलेल्या दुकानदारांना जागा देण्यात आली आहे. मात्र ही जागा त्यांना सोयीची वाचत नसल्याने दुकानदार या ठिकाणी व्यवसाय करण्यास नकार देत आहेत. मात्र काही दिवसांत या ठिकाणी त्यांना यावेच लागेल.

– अजितकुमार अंबिये, साहाय्यक आयुक्त, एल वार्ड, मुंबई महानगरपालिका