बुधवापर्यंत छोटे नाले गाळमुक्त करण्याचे आयुक्तांचे आदेश
गेल्या वर्षी पहिल्याच पावसात तुंबलेल्या मुंबईचा अनुभव लक्षात घेऊन महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता यांनी या वेळी नालेसफाईबाबत कडक धोरण अवलंबले आहे. विभागातील लहान नाल्यांच्या सफाईकडेही वैयक्तिक लक्ष देण्याचे आदेश साहाय्यक आयुक्त व उपायुक्तांना देण्यात आले असून पुढील सूचना मिळेपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांच्या साप्ताहिक रजाही रद्द करण्यात आल्या आहेत. बुधवार, २५ मेपर्यंत लहान नाल्यांतील गाळ बाजूला काढण्याचे आदेश देण्यात आले असून गुरुवारपासून आयुक्त अचानक भेट देऊन पाहणी करतील.
मे अखेपर्यंत चालणारी नालेसफाई आणि त्यानंतरही तुंबलेले नाले हे चित्र मुंबईकरांना नवीन नाही. तरंगणाऱ्या कचऱ्याखालून पाणी वाहते आहे, असे स्पष्टीकरण पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून मिळणेही नवीन नाही. मात्र गेल्या वर्षी जूनच्या पहिल्या आठवडय़ात १०० टक्के नालेसफाईचा दावा करणारे पालिका प्रशासन १९ जूनला तोंडावर आपटले. हा अनुभव, नालेसफाईबाबत सत्ताधाऱ्यांवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप आणि आठ महिन्यांवर आलेल्या निवडणुका लक्षात घेता या वेळी आयुक्त मेहता यांनी कडक धोरण अवलंबले आहे. सोमवारी नालेसफाईसंदर्भात साहाय्यक आयुक्त व उपायुक्तांची बैठक आयुक्तांनी घेतली. या बैठकीत संबंधित वॉर्डमधील लहान नाल्यांच्या सफाईबाबतची माहिती आयुक्तांना देण्यात आली. लहान नाल्यांमधील गाळाचे बाहेर काढलेले ढीग चटकन उचलले जात नाहीत व पहिल्या पावसासोबत ते पुन्हा नाल्यात जातात. त्यामुळे असे लहान ढीग न करता एकाच ठिकाणी गाळ गोळा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नालेसफाईसाठी ३१ मेच्या डेडलाइनची वाट न पाहता हे काम बुधवापर्यंत पूर्ण करणे अपेक्षित आहे.
नाल्यातील पाण्याचा प्रवाह वाहता राहण्यासाठी गाळ, दगड व डेब्रिज उचलावे व त्यासाठी पर्जन्यजलवाहिन्या, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन विभागाचीही मदत घ्यावी अशा सूचना साहाय्यक आयुक्तांना देण्यात आल्या. या सर्व कामावर वॉर्ड अधिकाऱ्यांनी वैयक्तिक लक्ष द्यायचे असून त्यासाठी त्यांच्या साप्ताहिक सुट्टय़ा रद्द करण्याचे आदेश आयुक्त मेहतांनी दिले.
३१ मेची डेडलाइन पाहता अधिकाऱ्यांना एकाच आठवडय़ाची रजा गमवावी लागणार असली तरीही नालेसफाईची सद्य:स्थिती तसेच पावसासाठी करावी लागणारी इतर तयारी पाहता पाऊस येईपर्यंत पालिका अधिकाऱ्यांना साप्ताहिक रजा गमावण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.