पालिका शाळांतील १५० शिक्षकांना करोना प्रतिबंध प्रशिक्षण

मुंबई : करोना संसर्गामुळे सध्या शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. मात्र भविष्यात शाळा सुरू झाल्यानंतर कोणती काळजी घ्यावी याविषयी मुंबई महापालिका शाळांतील १५० शिक्षकांना करोना प्रतिबंध प्रशिक्षण देण्यात येत आहे. आपापल्या शाळांमधील अन्य शिक्षकांना करोना प्रतिबंध उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्याची जबाबदारी या १५० शिक्षकांवर सोपविण्यात येणार आहे.

करोनामुळे लागू करण्यात आलेली टाळेबंदी टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात येत आहे. उपनगरीय रेल्वे सेवा सर्वसामान्यांसाठी खुली करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तसेच भविष्यात शाळाही सुरू होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात केंद्र सरकारने सुुनिश्चिात कार्यपद्धती निश्चिात केली आहे. भविष्यात शाळेत येणाऱ्या विद्याथ्र्यांनी कशी काळजी घ्यावी, शिक्षकांनी कोणत्या प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, पालकांनी आपल्या स्तरावर कोणती खबरदारी घ्यायची याबाबत पालिका शाळांमधील १५० शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.

मुंबई महापालिकेच्या विविध माध्यमांच्या एक हजार १०० हून अधिक शाळांमध्ये दोन लाख ५० हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. करोना संसर्गामुळे सध्या शिक्षक विद्याथ्र्यांना ऑनलाइनच्या माध्यमातून शिक्षण देत आहेत. असे असले तरी भविष्यात प्रत्यक्ष शाळा सुरू होण्याची शक्यता लक्षात घेऊन करोनाविषयक प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत विद्यार्थी, शिक्षक, पालकांच्या स्तरावर जनजागृती करण्याची गरज लक्षात घेऊन प्रशासनाने शिक्षकांचे प्रशिक्षण सुरू केले आहे.

प्रशिक्षण कार्यक्रमात सामाजिक अंतर राखता यावे यासाठी १२० व्यक्तींची क्षमता असलेल्या सभागृहात दररोज केवळ ३० शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. यानुसार सलग ५ दिवस चालणाऱ्या या प्रशिक्षण कार्यक्रमात एकूण १५० शिक्षकांना ‘कोविड’ प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत प्रशिक्षण देण्यात येत आहे. हे प्रशिक्षणार्थी शिक्षक आपल्या शाळेतील, तसेच आसपासच्या पालिका शाळांमधील शिक्षकांना याबाबतचे प्रशिक्षण देणार आहेत. या प्रशिक्षणानंतर याच पद्धतीने खासगी – प्राथमिक शाळांमधील शिक्षकांनाही प्रशिक्षण देण्याचे प्रस्तावित असल्याचे महापालिकेचे शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी सांगितले.