महापालिकेच्या शिक्षण विभागाचा २०२१-२२ या आर्थिक वर्षांचा २९४५.७८ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प बुधवारी सहआयुक्त रमेश पवार यांनी शिक्षण समिती अध्यक्ष संध्या दोशी यांना सादर केला. गेल्यावर्षीपेक्षा यंदाच्या अर्थसंकल्पात केवळ १ कोटी २९ लाखांची वाढ झाली आहे. महापालिकेच्या सर्व शाळांचे नामांतर ‘मुंबई पब्लिक स्कूल’ करण्यात आले, हे या अर्थसंकल्पाचे प्रमुख वैशिष्टय़. गतवर्षीच्या योजनांसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात अधिक तरतूद करण्यात आली आहे.

महापालिकेच्या शिक्षण विभागाने चालू आर्थिक वर्षांत (२०२०-२१) २९४४.५९  कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. गेल्या आर्थिक वर्षांतील (२०१९-२०) अर्थसंकल्पापेक्षा त्यात २१०.८२ कोटींनी वाढ के ली होती. मात्र येत्या आर्थिक वर्षांतील अर्थसंकल्पात के वळ १ कोटी २९ लाखांची वाढ झाली आहे. या वर्षी भांडवली खर्चासाठी २४४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. डिजिटल क्लासरूम, व्हच्र्युअल क्लासरूम, अक्षरशिल्प, स्वसंरक्षण प्रशिक्षण, अपंग विद्यार्थ्यांंना शिष्यवृत्ती, उपस्थिती भत्ता अशा जुन्याच योजनांबरोबरच काही नवीन योजनांसाठी तरतूद करण्यात आली आहे.

पालिके च्या शाळांबद्दल जनतेच्या मनात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा याकरिता पालिका शाळांचे नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्राथमिक विभागाच्या ९६३ आणि माध्यामिक विभागाच्या २२४ मनपा शाळांच्या मूळ नावासह मुंबई पब्लिक स्कूल असे संबोधण्यात येणार आहे. त्याकरिता नवीन बोधचिन्ह तयार करण्यात आले आहे. त्याचा वापर पालिकेच्या सर्व शाळांसाठी करण्यात येणार आहे.

ठळक वैशिष्टय़े

* पालिकेच्या मालकीची एकूण ६३ मैदाने असून त्यापैकी ४३ मैदाने सुस्थितीत आहेत. उर्वरित मैदानांचा शाळा पायाभूत सुविधा कक्षामार्फत विकास. यासाठी पाच लाख रुपयांची प्राथमिक तरतूद.

* विद्यमान उच्च प्राथमिक शाळा भविष्यात दहावी इयत्तेपर्यंत वाढवणार. २४ माध्यमिक शाळा सुरू करण्यात येणार आहेत.

* सीबीएसई बोर्डाच्या दहा नवीन शाळांसाठी प्रवेश प्रक्रिया लवकरच. याकरिता दोन कोटींची तरतूद.

* उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी अंतरंग फाऊंडेशनच्या लोकसहभागातून पालिका माध्यमिक शाळांमधील नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता मार्च २०२१ पासून समाज माध्यमांच्या साहाय्याने (व्हॉट्सअ‍ॅप चॅटबोट) विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच करिअर टेन लॅब संस्थेमार्फत महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया पार पाडण्याकरिताही मार्गदर्शन केले जाणार आहे.

* दहावीत उत्तीर्ण होऊन प्रथम येणाऱ्या २५ विद्यार्थ्यांकरिता व्यावसायिक शिक्षणासाठी प्रतिवर्षी प्रतिविद्यार्थी २५ हजार रुपये अथवा संबंधित शिक्षण संस्थेने ठरवून दिलेले पूर्ण शैक्षणिक शुल्क देण्यात येणार आहे. त्याकरिता ३५ लाखाची तरतूद करण्यात आली आहे.

दहा नवीन शाळांची उभारणी

भांडवली कामांमध्ये मुख्यत: शाळांची दुरुस्ती, पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. त्याकरिता १९० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पालिके च्या मालकीच्या ४६७ शालेय इमारती आहेत. त्यापैकी मार्च २०२१पर्यंत ४३ इमारतींची दुरुस्ती पूर्ण करण्यात येणार आहे. तर येत्या आर्थिक वर्षांत आणखी आठ कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. सहा शाळांची पुनर्बाधणी मार्चमध्ये पूर्ण होणार असून येत्या वर्षांत १३ शाळांची पुनर्बाधणी होणार आहे. तर मोकळ्या भूखंडावरील नवीन शालेय इमारतींची बांधणीची १० कामे प्रगतिपथावर असून त्यापैकी नऊ कामे येत्या आर्थिक वर्षांत पूर्ण करण्यात येणार आहेत.