– संदीप आचार्य

मुंबईतील करोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत असून रुग्णालयांवर प्रचंड ताण पडलेला आहे. करोनाबाधितांची सेवा करताना रुग्णालयांच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाच लागण होण्याचेही प्रकार समोर आले आहेत. परंतु त्यातही विशेष बाब म्हणजे विलगीकरण करावे लागलेल्या खासगी रुग्णालयांतील कर्मचाऱ्यांची संख्या पालिकेच्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या तुलनेत जास्त दिसून आली आहे. करोनाबाधित वा संशयित कर्मचाऱ्यांमुळे अनेक पंचतारांकित रुग्णालयांसह खासगी नर्सिंग होम्सचे बाह्यरुग्ण विभाग तसेच रुग्णालये ‘लॉकडाऊन’ करण्याची वेळ आली आहे. करोनाबाधित वा संपर्कात आलेले जवळपास दहा टक्के रुग्णालयीन कर्मचारी असून यात महापालिका रुग्णालयांतील कर्मचाऱ्यांचे प्रमाण अत्यल्प असून यामध्ये प्रामुख्यानं खासगी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले.
जसलोक, ब्रीचकँडी, सैफी, वोकहार्ट पासून मुंबईतील अनेक छोट्या मोठ्या नर्सिग होम व रुग्णालयातील परिचारिका, डॉक्टर तसेच रुग्णालयाशी संबंधित कर्मचाऱ्यांना करोना रुग्णांशी संपर्क आल्यामुळे विलगीकरणात ठेवण्याची वेळ आली आहे. वोकहार्ट मध्ये परिचारिकांनाच लागण झाल्यामुळे त्यांच्यावर रुग्णालय बंद करण्याची वेळ आली. सैफी, जसलोकसह काही पंचतारांकित रुग्णालयांना त्यांचे बाह्यरुग्ण विभाग बंद करावे लागले. या रुग्णालयांनी नवीन रुग्ण स्वीकारणे बंद केले असून अनेक नर्सिंग होममध्येही परिचारिका तसेच अन्य कर्मचार्यांना करोनाची लागण झाल्याच्या संशयावरून रुग्णालये बंद करावी लागत आहेत. मुंबईतील एकूण ९५४ करोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी जवळपास १० टक्के केसेस या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांशी संबंधित असल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले.

अनेक खासगी रुग्णालयात कर्मचाऱ्यांचा करोना रुग्णांशी बाह्यरुग्ण विभागात तपासणीच्यावेळी संपर्क आला. यामुळे खासगी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर क्वारंटाईन करावे लागले आहे. तसेच सावधगिरी म्हणून रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग अथवा रुग्णालयच बंद करावे लागले आहे.  या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर करोनाच्या रुग्णांवर उपचार होत असूनही या रुग्णालयांतील डॉक्टर, परिचारिका वा अन्य कर्मचाऱ्यांना करोनाची लागण होण्याची अथवा विलगीकरणाखाली येण्याची फारशी वेळ आलेली नाही. कस्तुरबा रुग्णालय हे साथीच्या आजारांवर उपचार करणारे मुंबई महापालिकेचे प्रमुख रुग्णालय असून तेथे मोठ्या संख्येने सध्या करोना बाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. मात्र आजपर्यंत या रुग्णालयातील एकाच कर्मचाऱ्याला विलगीकरणाखाली ठेवावे लागल्याचे पालिकेच्या एका ज्येष्ठ डॉक्टरने सांगितले. याशिवाय अन्य काही रुग्णालयांतील परिचारिका व कर्मचाऱ्यांना विलगीकरणाखाली ठेवावे लागले असले तरी खासगी रुग्णालयांच्या तुलनेत हे प्रमाण अत्यल्प असल्याचे अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. केईएम रुग्णालयात एका डॉक्टरवर क्वारंटाईन होण्याची वेळ आली असली तरी त्याचा रुग्णालयाशी संबंध नसल्याचे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ हेमंत देशमुख यांनी सांगितले.

महापालिकेच्या विविध रुग्णालयांत करोनाबाधित रुग्ण मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. यात चाचणी करण्यासाठी आलेल्या संशयितांपासून ते विलगीकरणासाठीचे अनेक लोक आहेत. काहींची लोकांची पहिली चाचणी निगेटिव्ह आली तर दुसऱ्या चाचणीत हेच लोक पॉझिटिव्ह आढळून आले. अशांच्या संपर्कातील परिचारिका वा कर्मचाऱ्यांना लगेच विलगीकरणाखाली ठेवण्यात आले असून त्यांच्या चाचण्या केल्या जात आहेत. करोनाबाधित रुग्णांच्या विभागात काम करणारे डॉक्टर, परिचारिका तसेच अन्य कर्मचाऱ्यांसाठी पालिका काटेकोरपणे काळजी घेत आहे. कोठे त्रुटी असल्याचे वा कमतरता असल्याचे लक्षात येताच तात्काळ तेथे आवश्यक त्या सुधारणा आम्ही करत असल्याचे सुरेश काकाणी यांनी सांगितले.

मुंबईतील जी मोठी खासगी रुग्णालये करोना संबंधित कर्मचाऱ्यांमुळे बंद करावी लागली वा ज्यांचे बाह्य रुग्ण विभाग बंद केले आहेत अशा रुग्णालयांना फ्युमिगेशन केल्यानंतर पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली जात आहे. जसलोक रुग्णालयासह काही रुग्णालयातील निर्जंतुकीकरणाचे काम पूर्ण झाले असून येत्या एकदोन दिवसात ही रुग्णालये वा त्यांचे बंद असलेले बाह्यरुग्ण विभाग सुरू होतील असेही अतिरिक्त आयुक्त काकाणी यांनी सांगितले.

एकट्या मुंबईत आज सुमारे एक हजाराहून अधिक करोना संसर्ग झालेले रुग्ण महापालिका रुग्णालयात उपचार घेत असून योग्य काळजी घेत असल्यामुळे कर्मचाऱ्यांना बाधा होण्याचे प्रमाण अल्प असल्याचे पालिका सूत्रांचे म्हणणे आहे.