उद्योगपती मुकेश अंबानी यांना धमकावण्यासाठी वापरण्यात आलेल्या मोटारीचे ताबेदार मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्युप्रकरणी रविवारी राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) हत्येचा गुन्हा दाखल केला.

अंबानी कुटुंबीयांना देण्यात आलेली धमकी, मनसुख यांच्या मोटारीची चोरी आणि मनसुख यांचा मृत्यू या प्रकरणांचा तपास शनिवारी एटीएसकडे सोपवण्यात आला. एटीएसने या तीनही प्रकरणांशी संबंधित कागदपत्रे मुंबई, ठाणे पोलिसांकडून रविवारी ताब्यात घेतली. तसेच मनसुख यांच्या ठाणे येथील निवासस्थानी भेट देत त्यांच्या पत्नी विमला यांचा जबाब नोंदवला.

मनसुख यांची हत्या करण्यात आल्याचा संशय विमला यांनी व्यक्त केला. त्यांचा संशय आणि मनसुख यांच्या शवचिकित्सेतून वर्तविण्यात आलेला प्राथमिक अंदाज या आधारे एटीएसने सामायीक इराद्याने कट रचत हत्या, पुरावा नष्ट करणे आदी कलमांनुसार गुन्हा नोंदवण्याचा निर्णय घेतला. राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी त्यास दुजोरा दिला.

गेल्या आठवडय़ात अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ मनसुख यांची चोरी झालेली मोटार बेवारस अवस्थेत आढळली होती. या गाडीत सुमारे अडीज किलो जिलेटिन आणि अंबानी कुटुंबाला धमकावणारी चिठ्ठी आढळली होती. याप्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून मुंबई गुन्हे शाखेने तपास सुरू केला होता. मात्र मनसुख यांची गाडी चोरणारे, स्फोटके दडवून ती गाडी अंबानी यांच्या घराजवळ ठेवणाऱ्यांबाबत मात्र कोणतीही ठोस माहिती गुन्हे शाखेच्या हाती लागली नव्हती.

विधानसभेत विरोधी पक्षनेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तपास अधिकारी सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले. त्याच दिवशी सकाळी मनसुख यांचा मृतदेह मुंब्रा खाडीत आढळला होता.

ती मोटार हिरेन यांच्या ताब्यात होती. ते मोटारीचे मालक नव्हते. मूळ मालक आणि मनसुख यांच्यात आर्थिक व्यवहार होते. मालकाकडून मनसुख यांना काही रक्कम येणे होती. तडजोड म्हणून मालकाने तीन वर्षांपूर्वी ही मोटार मनसुख यांच्या ताब्यात दिली. पुढे आर्थिक व्यवहार पूर्ण झाला नाही आणि ही मोटार मनसुख यांच्या ताब्यातच राहिली. त्या दोघांमधील आर्थिक वाद ठाण्यातील नौपाडा पोलिसांपर्यंत पोहोचला होता. मात्र तीन वर्षे मोटार ताब्यात असूनही मनसुख यांनी ती स्वत:च्या नावे करून घेतली नव्हती, अशी माहिती गुन्हे शाखेच्या तपासातून पुढे आली होती. या माहितीची खातरजमा सुरू होती, असे गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

अंबानींच्या घरासमोर स्फोटकांचे प्रकरण

मनसुख संशयितांच्या यादीत नव्हते

उद्योगपती मुकेश अंबानी धमकी प्रकरणात मनसुख हिरेन हे संशयित आरोपी नव्हते. मात्र त्यांच्या मालकीच्या स्कॉर्पिओ मोटारीमध्ये स्फोटके आणि अंबानी कुटुंबाला धमकावणारी चिठ्ठी आढळल्याने त्यांच्याकडे अधिकाधिक चौकशी करणे क्रमप्राप्त होते, असे गुन्हे शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले. मृत्युपुर्वी मनसुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, मुंबई आणि ठाणे पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार केली होती. त्या तक्रोरीनुसार मुंबई गुन्हे शाखेसह विक्रोळी पोलीस, राज्य दहशतवादविरोधी पथक (एटीएस), राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) चौकशी केली. या यंत्रणांनी आरोपी असल्याप्रमाणे चौकशी केली. तेच प्रश्न सतत विचारून छळ सुरू केला, असा दावा मनसुख यांनी अर्जात केला होता. त्यावर गुन्हे शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार जर मनसुख संशयित असते, त्यांच्या चौकशीतून किंवा त्यांनी दिलेल्या माहितीतून त्यांच्याभोवतीच संशयाचे जाळे निर्माण झाले असते तर त्यांना मोकळे का सोडले असते? गुन्हे शाखेव्यतिरिक्त एटीएस, एनआयए, स्थानिक पोलिसांनीही त्यांची चौकशी केली होती. अन्य यंत्रणांना संशय निर्माण झाला असता तर मनसुख यांना ताब्यात घेण्यात आले असते, संशयाच्या जोरावर अटक करून पोलीस कोठडीत त्यांची चौकशी करण्यात आली असती.

या गाडीचे मूळ मालक आणि मनसुख यांच्यात आर्थिक व्यवहार होते. तीन वर्षांपूर्वी तडजोड म्हणून मूळ मालकाने ही कार मनसुख यांना दिली होती. या दोघांमधील आर्थिक वाद ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला होता, अशी माहिती मनसुख यांच्या चौकशीतून पुढे आल्याचा दावाही या अधिकाऱ्याने केला.