शीना बोरा हत्याप्रकरणी २३पर्यंत कोठडी

शीना बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी हिचा पती पीटर मुखर्जी याला शुक्रवारी महानगरदंडाधिकाऱ्यांनी २३ नोव्हेंबपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली. शीनाच्या हत्येचा कट रचणे आणि हत्या केल्याचा आरोप सीबीआयने पीटरवर ठेवला आहे.
गुरुवारी एकीकडे सीबीआयच्या एका पथकाकडून इंद्राणी आणि प्रकरणातील अन्य दोन आरोपींविरोधात महानगरदंडाधिकाऱ्यांसमोर आरोपपत्र दाखल केले जात असताना दुसरीकडे सीबीआयच्या दुसऱ्या पथकाकडून पीटर मुखर्जीला अटक करण्यात आली होती. पीटरला शुक्रवारी कोठडीसाठी अतिरिक्त मुख्य महानगरदंडाधिकारी आर. व्ही. अदोणे यांच्यासमोर हजर करण्यात आले. शीनाच्या हत्येचा कट रचण्यामध्ये इंद्राणीसह पीटरचाही समावेश होता. शीनाची हत्या करण्यातही त्याची महत्त्वाची भूमिका होती, असे सीबीआयच्या वतीने अ‍ॅडिशन सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी न्यायालयाला सांगितले. शीनाच्या हत्येचा कट रचला जात असताना, तो प्रत्यक्षात आणला जात असताना तसेच त्यानंतर पीटर इंद्राणीच्या सतत संपर्कात होता. इंद्राणी आणि शीनामधील वादात पीटर मध्यस्थ होता. शीनाबाबत त्याने मुलगा राहुलचीही दिशाभूल केली, असा दावा सिंह यांनी पीटरला सीबीआय कोठडी देण्याची मागणी करताना केला.
दरम्यान, पीटरला अटक केल्यानंतर सीबीआयने राहुललाही चौकशीसाठी नरिमन पॉइंट येथील कार्यालयात बोलावले. १२ तास चौकशी केल्यानंतर शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास राहुल पुन्हा घरी परतला.