बोरिवलीतील घटना; रिक्षाचालकाला अटक

दोन रुपये सुटे मागणाऱ्या प्रवाशाला रिक्षाचालकाने बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू ओढवल्याची धक्कादायक घटना बोरिवली (प.) येथे शुक्रवारी रात्री गणपत पाटील नगर येथे घडली. एम. एच. बी. पोलिसांनी रिक्षाचालक रामपरवेश चौहान (वय २६) याला अटक केली असून त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

बोरिवलीच्या गणपत पाटील नगर येथे राहणारे सरजूप्रताप सहानी (वय ४५) व्यवसायाने खासगी सुरक्षारक्षक आहेत. शुक्रवारी रात्री कामावरून घरी परतण्यासाठी त्यांनी रेल्वे स्थानकाजवळून शेअर रिक्षा पकडली. स्थानकापासून त्यांच्या घरापर्यंत १२ रुपये भाडे आहे. सहानी यांनी रिक्षाचालक चौहानला २० रुपयांची नोट दिली. चौहानने सहानी यांना दोन रुपये सुटे देण्यास सांगितले. सुटे पैसे नसल्याचे सांगत सहानी यांनी चौहानकडे आठ रुपये परत मागितले. मग सुटय़ा पैशावरून या दोघांत वादावादी झाली. चिडलेल्या चौहानने सहानी यांना बेदम मारहाण सुरू केली. त्या वेळी, परिसरातील नागरिक धावत आले. त्यांनी भांडण सोडवत सहानी यांना कांदिवलीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल केले, आणि चौहानला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. रुग्णालयात दाखल करताक्षणीच डॉक्टरांनी सहानी यांना मृत घोषित केले. एमएचबी पोलिसांनी चौहानला न्यायालयात दाखल केले असता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. सुटय़ा पैशावरून सार्वजनिक वाहनचालक व प्रवाशांमधील वादातून जीव जाण्याची ही शहरातील पहिलीच घटना आहे.