घाटकोपरमधील प्रकार : तथाकथित प्रतिष्ठेपायी कृत्य; आरोपी अटकेत

ठरलेले लग्न मोडून प्रियकराशी लग्न केलेल्या आणि गर्भवती असलेल्या मुलीची तिच्या पित्यानेच हत्या केल्याचा गुन्हा घाटकोपर पोलिसांनी उघडकीस आणला. माटुंगा येथे पानाची गादी चालवणाऱ्या रामकुमार चौरसिया (४५) याने समाजातील तथाकथित प्रतिष्ठेसाठी हे निर्घृण कृत्य (ऑनर किलिंग) केल्याचे पोलिसांनी सांगितले.

घाटकोपरच्या नारायण नगर परिसरात रविवारी सकाळी मीनाक्षी चौरसिया (२०) हिचा मृतदेह सापडला होता. ती चार महिन्यांची गर्भवती होती. तिच्या मानेवर, डोक्यावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणा होत्या. मीनाक्षी आणि तिचा पती ब्रिजेश चौरसिया मूळचे अलाहाबादचे- एकाच गावचे रहिवासी होते. ब्रिजेशशी प्रेमसंबंध असल्यामुळे तिने दोन वेळा ठरलेले लग्न मोडले. शहरात राहणारा, चांगला कमावता पती हवा, असे कारण देत तिने आयत्या वेळी पहिले लग्न मोडले. त्यामुळे तिच्या वडिलांनी शहरातला मुलगा पाहून मार्चमध्ये तिचे लग्न ठरवले. मात्र फेब्रुवारीत मीनाक्षीने घर सोडले आणि ब्रिजेशशी लग्न केले.

पैसे देण्याच्या बहाण्याने बोलावले अन्..

खरेदीसाठी पैसे देण्याच्या बहाण्याने रामकुमारने शनिवारी रात्री आठच्या सुमारास मीनाक्षीला फोन करून नारायण नगर येथे बोलावले. पैसे देताना रामने मुद्दामहून काही नोटा खाली पाडल्या. त्या उचलण्यासाठी मीनाक्षी खाली वाकताच रामकुमारने धारदार हत्याराने तिच्यावर वार केले.

थाप कामी आली..

घाटकोपर पोलीस ठाण्याचे निरीक्षक (गुन्हे) विलास दातीर, उपनिरीक्षक दीप बने, मैत्रानंद खंदारे, उपनिरीक्षक संतोष जाधव आणि पथकाने तपास सुरू केला. ब्रिजेश आणि त्याचे कुटुंब, मीनाक्षीचे कुटुंब आणि तिने आधी लग्नास नकार दिलेले दोन तरुण संशयित होते. तांत्रिक तपासात हत्येपूर्वी रामकुमार नारायण नगरमध्ये होता हे स्पष्ट झाले. सुरुवातीला त्याने गुन्हा केल्याचे नाकारले. परंतु, तुझ्या मुलाने हत्या केल्याचे पुरावे आम्हाला मिळाले आहेत, ही पोलीस पथकाची थाप कामी आली. रामकुमारने गुन्हा कबूल केला.