ओशिवऱ्यातील व्यावसायिक इजाज खान यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. खान रहात असलेल्या मिल्लत नगर भागातील इमारतीच्या पुनर्विकासाच्या वादातून ही हत्या झाल्याचे उघड झाले आहे.
१५ डिसेंबर रोजी संध्याकाळी मिल्लत नगरजवळील वालावलकर उद्यानाजवळ जॉिगग करत असतांना इजाज खान यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करून त्यांची हत्या केली होती. ओशिवरा पोलिसांनी या प्रकरणी अरमान शेख (२३) मुबाशिर फिरोज अहमद (२२) आणि अथर अजमल खान उर्फ पापा (३३) यांना अटक केली आहे.  ओशिवरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी सांगितले की, इजाज अहमद खान मिल्लत नगर भागातील इमारतीत रहात होते. या भागात एकूण ६० इमारती असून त्या सर्व इमारतींची ‘मिल्लत नगर सोसायटी फेडरेशन’ स्थापन करण्यात आली होती. या फेडरेशनचे अध्यक्ष खान यांचे वडील होते.
गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आणि नवीन कार्यकारिणी निवडून आली. या भागाच्या इमारतींचा पुनर्विकास करण्याची योजना या नवीन कार्यकारिणीने आणली होती. त्याला मयत इजाज आणि त्यांच्या वडिलांचा विरोध होता. त्यातून हा वाद निर्माण झाला होता. अथर खान उर्फ पापा आणि मुबाशिर अहमद हे सुद्धा याच मिल्लत नगरमधील इमारतीत होते. शेकडो कोटींहून अधिक रकमेचा हा प्रकल्प आपल्या मर्जीतील बिल्डरला देण्यासाठी अरोपी अथर प्रयत्नशील होता. परंतु खान यांच्या विरोधामुळे त्याला हे काम मिळत नव्हते.