X

चहाचा कप फोडल्याने तीन वर्षीय मुलाची हत्या

घाटकोपरमधील घटना; आरोपी अटकेत

घाटकोपरमधील घटना; आरोपी अटकेत

रेल्वे प्रवासादरम्यान ओळख झालेल्या महिलेला घरात डांबून तिच्या तीन वर्षीय मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना आठ दिवसांपूर्वी घाटकोपर परिसरात घडली आहे. कप फोडल्याच्या शुल्लक कारणावरून ही हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. राजावाडी रुग्णालयातील डॉक्टरांना याची माहिती मिळताच त्यांनी ही बाब पंतनगर पोलिसांना सांगितली. त्यानुसार पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत यामध्ये नितीन पठारे (वय ३६) या आरोपीला अटक केली आहे.

मूळची नाशिक येथे राहणारी फिर्यादी महिला ही दोन मुलांसह पतीपासून वेगळी राहात आहे. दीड महिन्यापूर्वी तिची ओळख घाटकोपर येथे राहणाऱ्या नितीन पठारे याच्याशी झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाल्यावर महिलेने आरोपीला पती नांदवत नसल्याचे सांगितले. यावर आरोपीने तिला मुंबईत आपला भाऊ  वकील असल्याचे सांगत तुला न्याय मिळवून देऊ  असे आश्वासन देत तिला मुंबईत बोलावले. मात्र या ठिकाणी आल्यानंतर आरोपीने या महिलेला आणि तिच्या दोन मुलांना घरात डांबून ठेवले. आठ दिवसांपूर्वी महिला घरात नसताना तिचा ३ वर्षांचा मुलगा आहिल याच्या हातातून चहाचा कप खाली पडला. याच कारणावरून आरोपीने या मुलाची गळा आवळून हत्या केली.

आरोपीने या मुलाचा मृतदेह कल्याण येथील हाजी मलंग येथील जंगलात दफन केला. महिलेच्या पाच वर्षीय मुलीने आहिलच्या हत्येची माहिती आईला सांगितली. त्यामुळे तिने आरोपीकडे याबाबत विचारणा केली असता आरोपीने महिलेला आणि मुलीला जबर मारहाण करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान महिलेने धक्का देऊन तेथून पळ काढत शेजाऱ्यांची मदत घेतली. शेजाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना ही बाब सांगितली. त्यानुसार घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी या दोघी माय लेकींना राजावाडी रुग्णालयात दाखल केली. या ठिकाणी उपचार सुरू असताना महिलेने तिच्यासोबत घडलेला प्रकार येथील एका डॉक्टरला सांगितला. डॉक्टरने तात्काळ ही माहिती पंतनगर पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली.

First Published on: October 6, 2017 2:02 am
Outbrain