News Flash

संगीतसुधेने पार्लेकर तृप्त!

‘हृदयेश आर्ट्स संगीत महोत्सवा’ची मधुर सांगता

‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व प्रतिमा देऊन पं. मुकुल शिवपुत्र यांचा सत्कार करण्यात आला.               छाया-दिलीप कागडा

‘हृदयेश आर्ट्स संगीत महोत्सवा’ची मधुर सांगता

मकरसंक्रांतीला खाल्लेल्या गुळपोळीचा आणि तिळगुळांचा गोडवा जिभेवर असताना या गोडव्याशी स्पर्धा करेल, किंबहुना या गोडव्याला मागे टाकेल अशा माधुर्याची प्रचिती पार्लेकरांना रविवारी आली. निमित्त होते ‘लोकसत्ता’ व स्टेट बँक ऑफ इंडिया प्रस्तुत हृदयेश आर्टस् संगीत महोत्सवाचे!

गळ्यातल्या देखण्या सुरांशी स्पर्धा करेल असे देखणे रूप लाभलेल्या गायिका कौशिकी चक्रवर्ती यांच्या मधुर आवाजाने सुरू झालेली ही मैफल पं. राकेश चौरसिया यांनी ‘हंसध्वनी’सारखा खळाळता राग वाजवून वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवली. या मैफलीच्या शेवटी पं. मुकुल शिवपुत्र यांनी आपल्या गायनाने केला आणि समस्त रसिकांचे कानही संगीतसुधा पिऊन तृप्त झाले.

मुंबईत पडलेल्या गुलाबी थंडीचा आस्वाद घेण्यासाठी विलेपाल्र्यातील पार्ले-टिळक विद्यालयाच्या पटांगणात रविवारी संध्याकाळी श्रोते जमले. मैफलीची सुरुवात झाली तीच कौशिकी चक्रवर्ती यांच्या गायनाने! कौशिकी यांनी सुरांच्या पहिल्या आवर्तालाच मैफलीचा ताबा घेतला.

‘मधुबन’ रागातील ‘कान्हा कब आओगे द्वार’ ही बंदिश विलंबित तीन तालात सुरू करत त्यांनी हळूहळू लय वाढवत नेली. कौशिकी यांचे गायन सुरू असतानाच त्यांच्या मागे तानपुऱ्यावर साथीला बसलेला १० वर्षांचा चिमुरडा श्रोत्यांचे लक्ष वेधून घेत होता. पहिल्या बंदिशीनंतर कौशिकी यांनी या छोटय़ाची ओळख करून दिली आणि आईच्याच पावलावर पाऊल टाकून पुढे चाललेल्या लहानग्या निशित चक्रवर्तीच्या पाठीवर संपूर्ण सभागृहातून कौतुकाची थाप पडली. त्यानंतर कौशिकी यांनी आपले गुरू एस. पी. बालसुब्रह्मण्यम् यांना श्रद्धांजली म्हणून कर्नाटकी संगीतातील ‘तिल्लाणा’ सादर केला. त्यांचे गायन संपत असतानाच रसिक श्रोत्यांनी त्यांना ‘सुंदर ते ध्यान उभे विटेवरी’ हा संत तुकाराम महाराजांचा अभंग सादर करण्याची फर्माईश केली आणि कौशिकी चक्रवर्ती यांनीही त्या सावळ्या विठुरायाचे ‘सुंदर ध्यान’ साक्षात लोकांसमोर सुरांमधून उभे केले.

विलेपार्ले आणि शास्त्रीय संगीतातील दिग्गज कलाकार यांचे खास नाते आहे. पण या पाल्र्यात पहिल्यांदाच मैफल रंगवण्यासाठी आलेल्या पं. मुकुल शिवपुत्र यांचे स्वागत पार्लेकरांनी टाळ्यांच्या कडकडाटात केले. पं. कुमार गंधर्वासारखा शास्त्रीय संगीतातील ध्रुवतारा गुरू म्हणून लाभूनही किंबहुना त्याचमुळे पं. मुकुल शिवपुत्र यांनी आपली स्वतंत्र वाट चोखाळली आहे. ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व प्रतिमा देऊन पं. मुकुल शिवपुत्र यांचा सत्कार करण्यात आले.

बैठकीला बसण्याआधीच ‘गाणे चालू असताना छायाचित्रे काढल्यास गाणे अर्धवट टाकून निघून जाईन,’ अशी अटच पं. मुकुल शिवपुत्र यांनी घातली. अस्ताव्यस्त वाढलेल्या दाढीमिश्या, अगदी साधाच पण पांढरा झब्बा-लेंगा, गळ्याभोवती लपेटलेली पांढरी शाल अशा वेषात ते गायला बसले आणि ‘शंकरा’ रागाचे सूर त्यांनी छेडताच श्रोते आणि ते यांचे अद्वैत झाले. ‘शंकरा’ रागापासून सुरू झालेली पंडितजींची बैठक उत्तररात्री रंगत गेली आणि या हृदयेश आर्टस् संगीत महोत्सवाची सुरेल सांगता झाली.

चौरसिया-तळवलकर जुगलबंदी

भक्तिरसाने ओथंबलेल्या या मैफलीचा ताबा पुढे बासरीवादक पं. राकेश चौरसिया यांनी घेतला. संध्याकाळच्या वेळी वाजणारे बासरीचे सूर मनात काहूर उठवतात, पण पं. राकेश चौरसिया यांनी ‘जोग’ राग सादर करत संपूर्ण वातावरण या सुरांनी भारून टाकले. त्यानंतर राग हंसध्वनी सादर करताना त्यांनी तबलावादक सत्यजित तळवलकर यांच्यासह जुगलबंदी केली आणि रसिकांची वाहवा मिळवली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2017 2:24 am

Web Title: music festival in mumbai
Next Stories
1 फलाटांच्या उंचीवाढीसाठी मुदतवाढ
2 इंजिनातील स्फोटामुळे बेस्ट बसला आग
3 मराठा आरक्षणाचा मुद्दा तापणार?
Just Now!
X