राहुल देशपांडे व पं. रोणू मुजुमदार यांची जुगलबंदी
* पं. विश्वमोहन भट्ट यांची अनोखी संगीत मैफल
* रसिकांसाठी प्रवेश विनामूल्य
चतुरंग प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सवी रंगसंमेलनात रसिकांना सूर-तालाची मेजवानी मिळणार असून १२ डिसेंबर रोजी गेट वे ऑफ इंडियावर होणाऱ्या रंगसंमेलनासाठी रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे. या वेळी चतुरंग प्रतिष्ठानचा यंदाचा ‘जीवनगौरव पुरस्कार’ पारधी समाजासाठी काम करणाऱ्या गिरीश प्रभुणे यांना माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे.
गेट वे ऑफ इंडियाच्या प्रांगणात सायंकाळी ५ ते १० या वेळेत होणाऱ्या या रंगसंमेलनाच्या प्रारंभी राहुल देशपांडे (गायन) व पं. रोणू मुजुमदार (बासरी) यांची गायन आणि वादनाची जुगलबंदी होणार आहे. त्यांना संगीतसाथ रामदास पळसुले (तबला), आदित्य ओक (हार्मोनियम), पं. दुर्गाप्रसाद (पखवाज) हे करणार आहेत. तर कार्यक्रमाची सांगता पं. विश्वमोहन भट्ट यांच्या संगीत मैफलीने होणार असून यात भारतीय व राजस्थानी लोकसंगीताचा अनोखा मिलाफ रसिकांसाठी सादर केला जाणार आहे.
कार्यक्रमासाठी रसिकांना विनामूल्य प्रवेश असून या विनामूल्य प्रवेशिका महाराष्ट्र वॉच कंपनी (रानडे रोड, दादर, पश्चिम सकाळी १० ते रात्री ८), दीनानाथ नाटय़गृह, गडकरी रंगायतन (सकाळ व संध्याकाळ), चतुरंग गिरगाव कार्यालय (दूरध्वनी ०२२-२२८९३२८२ दुपारी १ ते रात्री ९), डोंबिवली कार्यालय (०२५१-२४२१२४२, सायंकाळी ५ ते रात्री ८) येथे मिळू शकतील.
यंदाचे रंगसंमेलन गेट वे ऑफ इंडियासह डोंबिवली, चिपळूण आणि गोवा येथेही (प्रत्येकी एक दिवस) आयोजित करण्यात येणार आहे. या रौप्यमहोत्सवी रंगसंमेलनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रांत सामाजिक कार्य करणाऱ्या २५ सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात येणार असून त्यांच्या कार्याची माहिती देणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन गेट वे ऑफ इंडिया येथे होणाऱ्या रंगसंमेलनात प्रकाशित केले जाणार आहे. तसेच गेट वेवर होणाऱ्या कार्यक्रमात याअगोदर झालेल्या २४ जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळ्यावरील संक्षिप्त ध्वनिचित्रफीतही दाखविण्यात येणार आहे.