नांदेड-वाघाळा महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने सत्ता कायम राखली असली तरी नांदेडमध्ये मुस्लीम मजलीस या संघटनेला मिळालेल्या यशाबद्दल सर्वाच्याच भुवया उंचावल्या गेल्या आहेत.  यामागे पुणे स्फोटाच्या पार्श्वभूमीवर मराठवाडय़ात झालेल्या मुस्लीम तरुणांची धरपकड आणि चिथावणीखोर प्रचार असल्याचे सांगण्यात येत असल्याने सामाजिक वर्तुळातही चिंतेचे वातावरण आहे.
नांदेड महापालिकेच्या निवडणुकीत हैदराबादस्थित मुस्लीम मजलीस या पक्षाने ११ जागा जिंकून सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला. या पक्षाच्या आंध्र प्रदेशमधील नेत्यांनी मुस्लीम वस्त्यांमध्ये चिथावणीखोर प्रचार केल्याचा आरोप काँग्रेसमधून केला जात आहे. नांदेडवर आंध्र प्रदेशचा पगडा असला तरी आतापर्यंत एवढे यश मजलीसला कधीच मिळाले नव्हते. पुणे बॉम्बस्फोटाबाबत मराठवाडय़ातील तीन युवकांना नुकतीच अटक झाली. तसेच चौकशीसाठी काही युवकांची धरपकड करण्यात आली होती. त्याची प्रतिक्रिया मुस्लीम वस्त्यांमध्ये उमटल्याचे सांगण्यात येते. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मुस्लीमबहुल प्रभागांमध्ये समाजवादी पक्षाला यश मिळाले होते.
 मुस्लीम समाज काँग्रेसपासून दूर चालला का, या प्रश्नावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी नकारात्मक उत्तर दिले. भिवंडी, मालेगाव महापालिकांच्या निवडणुकीत मुस्लीम समाजाने काँग्रेसला पाठिंबा दिल्याचा दावा ठाकरे यांनी केला.     
अशोक चव्हाणांची प्रतीक्षा कायम!
‘आदर्श’ घोटाळ्यामुळे प्रतिमा डागळली गेली असली तरी आपल्या प्रभावक्षेत्रात या घोटाळ्याचा काहीही परिणाम झालेला नाही हे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेड-वाघाळा महानगरपालिकेची निवडणूक एकहाती जिंकून दाखवून दिले आहे. नांदेडची निवडणूक अशोक चव्हाण यांनी प्रतिष्ठेची केली होती. या यशानंतर तरी आपले राजकीय पुनर्वसन व्हावे, असा अशोकरावांचा प्रयत्न असला तरी न्यायालयीन निकाल लागेपर्यंत काँग्रेस पक्षश्रेष्ठी घाई करण्याची शक्यता नाही.