नव्या मतपेढीसाठी ‘उत्तर प्रदेश फॉर्म्युला’

लोकसभा-विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागल्याने आपल्या मतपेढीचा आकार वाढवण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश भाजपने मुस्लिम महिलांच्या मतपेढीकडे लक्ष वळवले आहे. या रणनीतीचा भाग म्हणून राज्यभरातील मुस्लिमांशी संवाद साधण्यासाठी ४ मार्चपासून राज्यातील मुस्लिमबहुल भागांत संवाद यात्रा काढण्यात येणार आहे. त्याचीच तयारी करण्यासाठी १७ व १८ फेब्रुवारी रोजी राज्यातील १५० मुस्लिम महिलांचा अभ्यासवर्ग रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत होणार आहे.

उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत मुस्लिम महिलांनी भाजपला मतदान केल्याचे दिसून आले होते. मुस्लिम महिलांसाठी अन्यायकारक असलेल्या तिहेरी तलाक प्रथेला विरोध करत ती रद्द करण्यासाठी घेतलेला पुढाकार हा मुस्लिम महिलांमध्ये भाजपबाबत सहानुभूती निर्माण करण्यास कारणीभूत ठरला होता. ती बाब हेरत महाराष्ट्रातील मुस्लिम महिलांची मतपेढी आपल्याकडे वळवण्याची रणनीती भाजपने आखली आहे. आता लोकसभा निवडणुका सव्वा वर्षांवर आल्या आहेत. कदाचित त्याआधीही लोकसभा निवडणुका होण्याची चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा-विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागण्याची सूचना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना केली आहे. त्यामुळे आता भाजपतर्फे निवडणुकीच्या दृष्टीने काम सुरू झाले आहे.

येत्या ४ मार्चपासून राज्यभरातील मुस्लिमबहुल भागांत भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चातर्फे संवाद यात्रा काढण्यात येणार आहे. भाजपची ओळख ही हिंदुत्ववादी पक्ष अशी असल्याने मुस्लिमांच्या मनात विश्वास निर्माण करण्याचा, केंद्र व राज्य सरकारतर्फे मुस्लिम समाजासाठी केलेल्या कामांचा, योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम या संवाद यात्रेमार्फत करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हेही या संवाद यात्रेत काही ठिकाणी सहभागी होतील. २०११ च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येत मुस्लिमांचे प्रमाण ११.५४ टक्के आहे. राज्याची लोकसंख्या सुमारे १२ कोटी असून मुस्लिमांचे प्रमाण जवळपास सव्वा कोटी आहे. एकूण लोकसंख्ये महिलांचे प्रमाण सरासरी ५० टक्के गृहीत धरले जाते. त्या हिशेबाने राज्यात ६० लाख मुस्लिम महिला असाव्यात असा अंदाज आहे. आतापर्यंत या मतपेढीला कॉंग्रेससारख्या पक्षांनी गृहीतच धरले. आता मुस्लिम महिलाही स्वतंत्रपणे विचार करून मतदान करू शकतात, हा विचार करून भाजपने संवाद यात्रेत मुस्लिम महिलांच्या मतपेढीकडे अधिक लक्ष देण्याचे नियोजन केले आहे.

तिहेरी तलाकवर चर्चा

१७ फेब्रुवारी व १८ फेब्रुवारी असे दोन दिवस १५० मुस्लिम महिलांचा अभ्यासवर्ग रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत होणार आहे. त्यासाठी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्य़ातून पाच मुस्लिम महिला येणार आहेत. यात तिहेरी तलाक, कुशल भारत याबरोबरच मुस्लिमांच्या हितासाठी-प्रगतीसाठी भाजप सरकारने घेतलेले निर्णय यांची चर्चा होणार आहे, अशी माहिती भाजप प्रवक्त्यांनी दिली.