पालकांच्या समुपदेशनाला सुरुवात

जातपंचायतीला मूठमाती दिल्यानंतर वैदू समाजासाठी काम करणाऱ्या संघटनेने जोगेश्वरीतील राधाभाई चाळीतील मुस्लीम मुलांच्या शिक्षणासाठीही पुढाकार घेतला आहे. वैदू समाजाला प्रगतिपथावर आणण्यासाठी शिक्षणाची कास धरणे आवश्यक आहे. हे जाणून या मुलांच्या शिक्षणासाठी अनेक संस्थांनी मदतीचा हात पुढे केला आहे. अशीच चळवळ मुस्लीम मुलांसाठी राबवून त्यांनाही मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न ‘स्वयंसंघर्ष’ या सामाजिक संस्थेकडून सुरू केला आहे.

वैदू समाजातील २२८ मुलांच्या शिक्षणाचा खर्च विविध संस्थांमार्फत केला आहे. मात्र अजूनही १८४ मुलांच्या शाळेचा खर्च पूर्ण होऊ शकला नाही. आजही ही मुले शिक्षणापासून वंचित आहेत. त्याच धर्तीवर दुर्गा गुडिलू या वैदू समाजाच्या मुलीने जोगेश्वरी भागातील राधानगर या मुस्लीम वस्तीतील शाळाबाह्य़ मुलांसाठी मोहीम सुरू केली आहे. गेल्या आठवडय़ाभरात केलेल्या पाहणीत राधानगरातीस ८४ ते ९० मुले शाळाबाह्य़ आहेत. या मुलांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून अनेक मुले व्यसनाच्या अधीन गेली आहेत. त्यामुळे शैक्षणिक मदतीबरोबरच या मुलांचे व्यसन सोडविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

अनिवासी भारतीयांकडून मदतीचा हात

मुंबईत वैदू समाजाच्या १४ वस्त्या आहेत. आर्थिक परिस्थिती खालावलेली असल्याकारणाने या समाजातील मुलांना शाळेत जाता येत नाही. मात्र काही संस्था व वैयक्तिक मदतीमुळे या मुलांना शाळेत दाखल करणे शक्य होत आहे. काही दिवसांपूर्वी स्वित्र्झलडमध्ये राहणाऱ्या अनिवासी भारतीय दाम्पत्याने या मुलांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. यांनी वैदू समाजातील ८४ मुलांच्या शिक्षणासाठी ८ लाखांचा खर्च करण्याची तयारी दर्शविली आहे.